

वसंत माधव कुळकर्णी
विकसित भारताच्या प्रवासात दीर्घकालीन वाढीच्या संधी हस्तगत करण्यासाठी मल्टिकॅप फंड एक आदर्श साधन आहे. बरोडा बीएनपी परिबास मल्टिकॅप फंड हा लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे.
ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत भारतीय निर्यातीवर 50 टक्के आयात कर लादल्यानंतर भारतीय बाजारांनी मोठ्या अस्थिरतेला तोंड दिले. आता बाजार या अस्थिरतेतून सावरला आहे. गेल्या काही दिवसांत, जीएसटी दर कपातीनंतर बाजारात चांगली सुधारणा दिसून आली आहे. भारताचा पहिल्या तिमाहीतील जीडीपी 7.8 टक्क्यांनी वाढली. हा बाजारासाठी एक मोठा सकारात्मक धक्का होता. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या हंगामात मोठ्या खरेदीमुळे जीएसटी संकलनात मोठी वाढ अपेक्षित आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीत मोठी वाढ दिसून येण्याची शक्यता आहे.
सध्याच्या समष्टी अर्थशास्त्राच्या परिमाणानुसार बाजार परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी मल्टिकॅप किंवा फ्लेक्झीकॅप फंडाची कास धरणे योग्य ठरेल. सध्याचा बरोडा बीएनपी परिबास मल्टिकॅप फंड हा बीएनपी परिबास मल्टिकॅप आणि बडोदा मल्टिकॅप फंड यांच्या दि. 14-3-22 रोजी झालेल्या विलीनीकरणातून अस्तित्वात आला. या फंडाने अस्तित्वात आल्यापासून वार्षिक 16.41 टक्के परतावा दिला आहे.
बाजारातील वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या बाजार परिस्थितीत एकमेकांपेक्षा वेगळी (चांगली अथवा वाईट) कामगिरी करतात. मंदीत लार्जकॅप कंपन्या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी करतात. मिडकॅप आणि स्मॉल कॅप तेजीत लार्जकॅप पेक्षा चांगली कामगिरी करतात. म्हणूनच मल्टिकॅप फंड दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक सशक्त पर्याय म्हणून उदयास येताना दिसत आहेत.