

भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये लवकरच एक मोठा बदल घडणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर ईएमआय (EMI) चा पर्याय आणणार आहे. या सुविधेमुळे आता क्रेडिट कार्ड नसलेले ग्राहकही मोठी खरेदी करताना हफ्त्यांमध्ये पेमेंट करू शकतील. हा बदल यूपीआयला केवळ पेमेंट प्लॅटफॉर्मपुरता मर्यादित न ठेवता, एक संपूर्ण क्रेडिट इकोसिस्टम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना तर फायदा होईलच, पण त्याचबरोबर फिनटेक कंपन्या आणि बँकांसाठीही नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहेत.
एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन सुविधेत ग्राहक जेव्हा क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करतील, तेव्हा त्यांना ईएमआयमध्ये पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल. ही प्रक्रिया क्रेडिट कार्ड स्वाइप करून ईएमआय निवडण्यासारखीच असेल. सध्या फिनटेक कंपन्यांनी ही सुविधा सुरू केली नसली तरी, लवकरच ती मोठ्या प्रमाणात लागू केली जाईल.
पेटीएम (Paytm) आणि नावी (Navi) सारख्या फिनटेक कंपन्या ज्या आधीपासूनच बँकांसोबत मिळून क्रेडिट लाइनची सुविधा देतात, त्यांचा व्यवसाय या नवीन फीचरमुळे आणखी मजबूत होईल. यूपीआय आणि रूपे डेबिट कार्डवर सध्या कोणताही चार्ज लागत नाही, पण क्रेडिट पेमेंट्सवर सुमारे १.५% इंटरचेंज फीस आकारली जाईल. यामुळे फिनटेक कंपन्यांसाठी नवीन कमाईचा मार्ग मोकळा होईल.
पेयू (PayU) चे सीईओ अनिर्बन मुखर्जी यांच्या मते, यूपीआय आता केवळ पेमेंटचे साधन राहणार नाही, तर एक संपूर्ण पेमेंट प्रणाली बनेल. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, त्यांनाही आता 'बाय-नाऊ-पे-लेटर' (Buy-Now-Pay-Later) सारख्या मॉडेल्सचा फायदा घेता येईल.
उद्योग तज्ज्ञांच्या मते, यूपीआयवर छोटे कर्ज (छोटे लोन) आणि 'बाय-नाऊ-पे-लेटर' सारखे मॉडेल्स लोकप्रिय होतील. मात्र, बँकांनी यावर सावध भूमिका घेण्याची तयारी केली आहे. छोट्या कर्जांमध्ये 'बॅड लोन'चा (Bad Loan) धोका असतो. त्यामुळे कर्ज वितरणाची वाढ होईल, पण बँका यासाठी सावधगिरी बाळगतील.
सध्या यूपीआय दरमहा जवळपास २० अब्ज (20 Billion) व्यवहार करतो आणि त्याचे २५ ते ३० कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे ईएमआयचा पर्याय या नेटवर्कची ताकद कित्येक पटीने वाढवू शकतो.