Stock Market Closing Bell | Sensex पहिल्यांदाच ७४ हजार पार, Niftyचाही नवा उच्चांक | पुढारी

Stock Market Closing Bell | Sensex पहिल्यांदाच ७४ हजार पार, Niftyचाही नवा उच्चांक

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजाराने आज बुधवारी (दि.६) इतिहास रचला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) ७४,१०० पार झाला. त्यानंतर सेन्सेक्स ४०८ अंकांनी वाढून ७४,०८५ वर बंद झाला. सेन्सेक्स पहिल्यांदाच ७४ हजारांवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर निफ्टीने (Nifty) नवा उच्चांक नोंदवत २२,४९७ अंकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी ११७ अंकांनी वाढून २२,४७४ वर बंद झाला.

विशेष म्हणजे सेन्सेक्सने घसरणीतून रिकव्हरी करत नवे शिखर गाठले. सेन्सेक्सने आजच्या निच्चांकी पातळीपासून ६९४ अंकांची रिकव्हरी केली. बाजारात सुरुवातीला आज कमकुवत स्थिती दिसून आली होती. पण शेवटच्या तासांत खरेदीचा जोर वाढला. विशेषत: बँकिंग, आयटी आणि फार्मा स्टॉक्सनी बाजाराला नव्या शिखरावर नेले.

बाजारातील या वाढीला प्रायव्हेट बँक शेअर्स तेजीचा सपोर्ट मिळाला. क्षेत्रीय पातळीवर बँक निर्देशांक १ टक्क्यांनी आणि फार्मा निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढला. तर, ऑईल आणि गॅस, पॉवर, रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. BSE मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी घसरला.

सेन्सेक्स आज ७३,५८७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७४,१५१ अंकाला स्पर्श केला. सेन्सेक्सवर कोटक बँक, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, एम अँड एम, सन फार्मा, टायटन, एचसीएल टेक, टीसीएस, एलटी हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स घसरले.

निफ्टी आज २२,३२७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २२,४९० अंकापर्यंत झेप घेतली. निफ्टीवर बजाज ऑटो, कोटक बँक, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, एसबीआय लाईफ हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. तर अदानी एंटरप्रायजेस, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ओएनजीसी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.

निफ्टी प्रायव्हेट बँक तेजीत

निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक आज २०७ अंकांनी वाढून २३,९३८ वर गेला. यावर कोटक बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक हे शेअर्स टॉप गेनर्स होते.

स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री

संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान आज बुधवारी (दि. ६) सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात घसरण झाली होती. पण दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीवर जोरदार रिकव्हरी दिसून आली. दरम्यान, आज स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये विक्री झाली. गुंतवणूकदार काहीअंशी प्रॉफिट बुकिंगकडे वळल्याने सुरुवातीला बाजारात घसरण दिसून आली होती.

झोमेटॉचे शेअर्स घसरले

ब्लॉक डील दरम्यान झोमॅटोचे शेअर्स आज २ टक्क्यांहून अधिक घसरले. दुपारच्या व्यवहारात झोमॅटोचा शेअर्स १६१ रुपयांवर होता. वृत्तानुसार, अँट फायनान्शियल ग्रुप ब्लॉक डीलद्वारे ऑनलाइन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर झोमॅटोतील २ टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. (Zomato Share Price)

IIFL Finance ची घसरण थांबेना!

IIFL फायनान्स लिमिटेडचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी २० टक्क्यांनी घसरले. आज हा शेअर्स २० टक्क्यांनी घसरून BSE वर ३८२.८० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या निचांकावर आला. मंगळवारच्या सत्रातही हा शेअर्स २० टक्क्यांनी घसरला होता. तर सोमवारी तो ४ टक्क्यांनी घसरला होता. आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला (IIFL Finance) तत्त्काळ गोल्ड लोन मंजूर करणे अथवा लोन वितरण थांबवण्यास सांगितले आहे. सोन्याची शुद्धता आणि निव्वळ वजन तपासण्यात आणि प्रमाणित करण्यात गंभीर विचलन तसेच कर्ज मंजूर करताना आणि लिलावाच्या वेळेस लोन टू व्हॅल्यू रेशो (एलटीव्ही) चे उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मंगळवारी ५७४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,८३५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.

हे ही वाचा :

Back to top button