Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सपाट! निफ्टी २२,२१२ वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स सपाट! निफ्टी २२,२१२ वर बंद, जाणून घ्या मार्केटमधील घडामोडी

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी सुस्त स्थिती दिसून आली. सेन्सेक्स आज सपाट झाला. तो १५ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७३,१४२ वर स्थिरावला. तर निफ्टी २२,२१२ वर बंद झाला. निफ्टी ५० ने सलग पाचव्या सत्रात विक्रमी उच्चांक नोंदवला. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीने २२,२९७ अंकाला स्पर्श केला. त्यानंतर तो २२,२५० च्या खाली आला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात वरच्या स्तरावरून प्रॉफिट बुकिंग दिसून आले.

बीएसई मिडकॅप ०.२५ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.५३ टक्क्यांनी वाढला. आज बँकिंग स्टॉक्सचे नुकसान झाले. तर मीडिया स्टॉक्स चमकले. सरकारी बँकिंग आणि मेटल शेअर्समधील विक्रीमुळे बाजारात हलका दबाव दिसून आला. तर रियल्टी आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. (Stock Market Closing Bell)

सेन्सेक्स आज ७३,३९४ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ७३ हजार ते ७३,१५० दरम्यान व्यवहार केला. सेन्सेक्सवर मारुती, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, आयटीसी हे शेअर्स घसरले. तर बजाज फिनसर्व्ह, विप्रो, टायटन, एम अँड एम, रिलायन्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स वाढले.

sensex closing

निफ्टीवर बीपीसीएल, एचसीएल टेक, ओएनजीसी, भारती एअरटेल, मारुती हे शेअर्स घसरले. तर बजाज फिनसर्व्ह, डॉ. रेड्डीज, एसबीआय लाईफ, विप्रो, टायटन हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.

व्होडाफोन आयडियाचा शेअर्स तेजीत

आज व्होडाफोन आयडियाचा शेअर्स सुमारे ९ टक्क्यांनी वाढून १७.७५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या बोर्डाची २७ फेब्रुवारी रोजी इक्विटी निधी उभारणीसाठी बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर Vodafone Idea चे शेअर्स वधारले.

अंबानींच्या जिओ फायनान्शियलची कमाल

मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईवर १४ टक्क्यांनी वाढून ३४७ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर हा शेअर्स ३४० रुपयांवर स्थिरावला. यामुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे बाजार भांडवल पहिल्यांदाच २ लाख कोटींच्या पार झाले. मागील एका आठवड्यात हा शेअर्स २२ टक्क्यांनी आणि गेल्या ३ महिन्यांत ५० टक्क्यांनी वाढला आहे. (Jio Financial Services)

Nvidia बनला जगातील चौथा सर्वात मोठा स्टॉक

चीपमेकर Nvidia चे शेअर्स एका दिवसात सुमारे १६ टक्क्यांनी वाढले. यामुळे केवळ एका दिवसात त्यांच्या बाजार भांडवलात २७७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. यामुळे Nvidia आता जगातील चौथा सर्वात मोठा स्टॉक बनला आहे आणि मायक्रोसॉफ्ट (३ ट्रिलियन डॉलर) आणि ॲपल (२.८ ट्रिलियन डॉलर) नंतर अमेरिकेच्या शेअर बाजारातील तिसरा मोठा स्टॉक आहे. सौदी अरामकोचे बाजार भांडवल सुमारे २ ट्रिलियन डॉलर आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button