Closing Bell | IT चा बाजाराला सपोर्ट! सेन्सेक्स ७२ हजार पार, कोणते शेअर्स वधारले? | पुढारी

Closing Bell | IT चा बाजाराला सपोर्ट! सेन्सेक्स ७२ हजार पार, कोणते शेअर्स वधारले?

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. सुरुवातीला तेजी आणि त्यानंतर काही प्रमाणात बाजारात सुस्ती दिसून आली. पण आज सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स १७८ अंकांच्या वाढीसह ७२,०२६ वर बंद झाला. तर निफ्टी ५२ अंकांनी वाढून २१,७१० वर स्थिरावला. आज सुमारे १,७९८ शेअर्स वाढले, तर १,४९४ शेअर्स घसरले आणि ६२ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Closing Bell)

आयटी शेअर्स क्षेत्रीय पातळीवर टॉप गेनर्स होते. माहिती तंत्रज्ञान (IT) आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. तर फार्मा आणि पीएसयू बँक निर्देशांक प्रत्येकी ०.३ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप सपाट झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्स आज सुरुवातीला ७२,१०० वर गेला. त्यानंतर तो ७१,७७९ पर्यंत खाली आला. पण त्याने रिकव्हरी करत ७२ हजारांवर व्यवहार केला. सेन्सेक्सवर टीसीएस, एलटी, इन्फोसिस, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक बँक, सन फार्मा हे घसरले.

निफ्टीवर अदानी पोर्ट्स, एलटी, टीसीएस, LTIMINDTREE आणि एसबीआय लाईफ हे सर्वाधिक वाढले. तर ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, यूपीएल, कोटक बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील हे घसरले. निफ्टी बँक खाली येऊन ४८ हजारांवर राहिला. तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसने २१,४७० च्या जवळ व्यवहार केला.

भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २७० अंकांनी वाढून ७२,१०० वर गेला. तर निफ्टी ७७ अंकांनी वाढून २१,७३० पार झाला होता. सुरुवातीच्या तेजीत बँकिंग, ऑटो, एनर्जी आणि आयटी शेअर्स आघाडीवर राहिले होते. त्यानंतर बाजारात चढ-उतार दिसून आला.

IT शेअर्स तेजीत

टीसीएस, इन्फोसिस आणि IT क्षेत्रातील इतर मोठ्या कंपन्यांचे शेअर्स ट्रेडिंग दरम्यान १ टक्क्यांहून अधिक वाढले. मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरात वाढीचे सत्र थांबणार असल्याच्या शक्यतेने आयटी निर्देशांक आज १ टक्क्यांनी वाढला.

HAL चे बाजार भांडवल २ लाख कोटी पार

तेजस लढाऊ विमानांची निर्माता कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स (एचएएल) चे शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक वाढून ३ हजारांवर गेले. यामुळे HAL कंपनीच्या बाजार भांडवलाने आज प्रथमच २ लाख कोटींचा टप्पा ओलांडला.

हे ही वाचा :

Back to top button