Flashback 2023 Stock Market | छप्परफाड कमाई! २०२३ मध्ये ‘या’ शेअर्सनी गुंतवणूकदारांना केले मालामाल | पुढारी

Flashback 2023 Stock Market | छप्परफाड कमाई! २०२३ मध्ये 'या' शेअर्सनी गुंतवणूकदारांना केले मालामाल

पुढारी ऑनलाईन : २०२३ वर्ष हे भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वपूर्ण ठरले. यंदा सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक कामगिरी केली. यावर्षी एनएसई (NSE) निफ्टी ५० निर्देशांक सुमारे १८ टक्क्यांहून अधिक वाढला. तर बीएसई (BSE) सेन्सेक्स १७ टक्क्यांनी वाढला. देशातील महागाईत झालेली घट, जीडीपीत मजबूत वाढ, मजबूत कॉर्पोरेट कमाई आणि आगामी २०२४ मध्ये व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने भारतीय शेअर बाजारात विशेषतः गेल्या दोन महिन्यांत तेजी राहिली. देशांतर्गत आणि परदेशी अशा दोन्ही गुंतवणूकदारांचा बाजारात ओघ वाढल्यानेही दोन्ही निर्देशांकांनी नवे शिखर गाठले. (Flashback 2023 Stock Market)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स, निफ्टी नव्या शिखरावर

निफ्टीने २०२३ मध्ये उल्लेखनीय टप्पे गाठले. निफ्टी जूनमधील १९ हजारची पातळी ओलांडून सप्टेंबरमध्ये २० हजारांपर्यंत पोहोचला. तर निफ्टीने ८ डिसेंबर रोजी २१ हजारांचा टप्पा पार केला आणि पुढील काही ट्रेडिंग सत्रांत तो २१,५०० च्या उच्चांकावर गेला. नुकताच त्याने २१,५६० चा विक्रमी टप्पा ओलांडला.

त्याचप्रमाणे सेन्सेक्सनेही (S&P BSE) या वर्षी अभूतपूर्व उंची गाठली. सेन्सेक्सने जूनमध्ये ६४ हजारांचा टप्पा ओलांडला आणि जुलैमध्ये त्याने ६७ हजारंची पातळी गाठली होती. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सेन्सेक्सने ७ हजारांहून अधिक म्हणजेच सुमारे १२ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवली आणि नुकतीच त्याने ७१,९१० च्या उच्चांवर झेप घेतली.

भाजपचा विजय

भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने होत असून देशाचा जीडीपी वाढून ७.६ टक्के झाला आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन महत्त्वाच्या राज्यांत भाजपने मिळवलेली सत्ता आणि त्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात खरेदीचा वाढलेला ओघ यामुळे डिसेंबरमध्ये बाजारात मोठी वाढ पाहायला मिळाली.

तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आगामी वर्षात संभाव्य व्याजदर कपातीचे दिलेले संकेतांमुळे गुंतवणूदारांच्या भावना उंचावल्या. भारतीय बाजारातील मजबूत तेजीमुळे पहिल्या आठवड्यात ६ डिसेंबर रोजी एनएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने प्रथमच ऐतिहासिक ४ ट्रिलियनचा टप्पा पार केला.

टाटा मोटर्सने दिला ९० टक्के परतावा

यंदा ऑटो शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. देशाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि वाढत्या वैयक्तिक उत्पन्नामुळे वाहनांची मागणी वाढली. यामुळे ऑटो शेअर्स वधारले. सेमीकंडक्टर चिप्सची सहज उपलब्धता, स्टील आणि ॲल्युमिनिअमच्या किमतीतील घट यामुळे ऑटोमेकर्सच्या एकूण मार्जिनच्या रिकव्हरीस हातभार लागला. विशेषतः टाटा मोटर्सने आतापर्यंत जवळपास ९० टक्के परतावा देऊन निफ्टी ५० वर अव्वल स्थान पटकावले. गेल्या २० वर्षांतील या शेअर्सची तिसरी सर्वोत्तम वार्षिक कामगिरी आहे.

रेल्वेशी संबंधित ‘या’ ५ शेअर्सनी दिला बंपर परतावा

गेल्या वर्षभरात रेल्वेशी संबंधित पाच शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले. रेल्वेशी संबंधित पाच कंपन्यांचे शेअर्स गेल्या वर्षभरात किमान १६५ टक्क्यांनी वाढले. टीटागड रेल सिस्टीमच्या शेअरने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना ४०५ टक्के बंपर परतावा दिला आहे. सध्या टिटागड रेल्वे सिस्टीमचे शेअर्स १ हजारच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. (Flashback 2023 Stock Market)

जुपिटर वॅगन्स लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना २६० टक्के बंपर परतावा मिळवून दिला आहे. बुधवारी जुपिटर वॅगन्सचे शेअर्स ३१४ रुपयांवर होते. गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी जुपिटर वॅगन्सचे शेअर्स ९३ रुपयांच्या पातळीवर होते, जे यावर्षी ३२८ रुपयांच्या पातळीवर पोहोचले. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ही अशीच एक कंपनी आहे जिने गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेडचे ​​शेअर्स १८४ रुपयांवर पोहोचले आहेत. जे वर्षभरापूर्वी ६० रुपयांच्या पातळीवर होते. रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक बंपर परतावा मिळवून दिला आहे. यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

८२ टक्के शेअर्सनी मिळवून दिला सकारात्मक परतावा

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वरील ८२ टक्के शेअर्सनी यावर्षी १९ डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिला. परिणामी, बेंचमार्क NSE निफ्टी वर्षभरात १८ टक्क्यांनी वाढला, तर निफ्टी स्मॉलकॅप २५० आणि निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक अनुक्रमे ४६ टक्के आणि ४२ टक्क्यांनी वाढले. कोटक सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास युद्ध, जागतिक महागाईवाढ, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, यूएस यिल्‍डमध्ये वाढ आणि वापरातील मंदी यासारख्या प्रतिकूल घटकांचा विचार करता भारतीय बाजारात झालेली वाढ असाधारण आहे.

यंदाच्या वर्षातील टॉप गेनर्समधील जय बालाजी इंडस्ट्रीजचे शेअर्स गेल्या वर्षीच्या ३० डिसेंबरच्या ५४.७० रुपयांच्या तुलनेत १९ डिसेंबर २०२३ रोजी सर्वाधिक १,२९१ टक्क्यांनी वाढून ७६१.०५ वर पोहोचले. त्यापाठोपाठ S&S पॉवर स्विचगियर ६१६ टक्क्यांनी वाढला. तसेच गीके वायर्स (५४४ टक्क्यांनी वाढ), ऑरियनप्रो सोल्युशन्स (५०१ टक्क्यांनी वाढ), आयनॉक्स विंड एनर्जी (३९८ टक्क्यांनी), सर्वोटेक पॉवर सिस्टम्स (३८४ टक्क्यांनी वाढ), थॉमस स्कॉट (भारत) (३७१ टक्क्यांनी वाढ), टिटागड रेलसिस्टम्स (३६९ टक्क्यांनी वाढ), जेआयटीएफ इन्फ्रालोजिस्टिक्स (३६३ टक्क्यांनी वाढ), आशापुरा माइनकेम (३५१ टक्क्यांनी वाढ) आणि एमको इलेकॉन (भारत) (३९५ टक्क्यांनी वाढ) या शेअर्सनीही मोठा परतावा मिळवून दिला.

Back to top button