Stock Market Closing Bell | Nifty चा विक्रमी उच्चांक, सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, तेजीमागे होते 'हे' ६ घटक | पुढारी

Stock Market Closing Bell | Nifty चा विक्रमी उच्चांक, सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, तेजीमागे होते 'हे' ६ घटक

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेत, सप्टेंबर तिमाहीत भारताची अपेक्षेपेक्षा चांगली ७.६ टक्के जीडीपी वाढ आणि पाच राज्यांतील निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने आज शुक्रवारी (दि. १ डिसेंबर) मोठी उसळी घेतली. विशेष म्हणजे सलग चौथ्या सत्रात बाजार वधारला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ६७,४९९ वर पोहोचला. तर निफ्टी ५० ने (Nifty50) नवीन विक्रमी उच्चांक नोंदवत १४२ अंकांच्या वाढीसह २०,२७० च्या वर झेप घेतली. त्यानंतर सेन्सेक्स ४९२ अंकांनी वाढून ६७,४८१ वर बंद झाला. तर निफ्टी १३४ अंकांनी वाढून २०,२६७ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

ऑटो वगळता इतर क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार केला. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, मेटल, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १ टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्सवर काय स्थिती?

सेन्सेक्स आज ६७,१८१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६७,५६४ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर आयटीसी, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, एलटी, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स सर्वांधिक वाढले. विप्रो, एम अँड एम, कोटक बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले.

मोठ्या नफ्यानंतर ‘हे’ शेअर्स घसरले

निफ्टीने २०,२८५ अंकांची उच्चांकी झेप घेतली असतानाही टाटा टेक्नॉलॉजीज, गंधार ऑईल रिफायनरी इंडिया आणि इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एनर्जी एजन्सी (IRDEA) चे शेअर्स आज १ डिसेंबर रोजी २ ते ७ टक्क्यांनी घसरले. हे शेअर्स मोठ्या प्रीमियमवर शेअर बाजारात सूचिबद्ध झाले होते. टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज एनएसई (NSE) वर सुमारे ६.५४ टक्क्यांनी घसरून १,२२७ रुपयांवर आला. कारण गुरुवारी या शेअर्सच्या बंपर लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक केला होता. गुरुवारी शेअर बाजारात पदार्पण करताना या शेअरने ५०० रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत शेअरने तब्बल १८० टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. टाटा टेकच्या शेअर्सने काल ट्रेडिंग सत्र बंद होण्यापूर्वी पदार्पणातच १,४०० रुपयांवर व्यवहार करत उच्चांक गाठला होता. त्यानंतर हा शेअर १,३१३ रुपयांवर बंद झाला होता.

बाजारातील तेजीमागील घटक

सकारात्मक जागतिक संकेत, जीडीपीत झालेली मजबूत वाढ, परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारात खरेदीसाठी परतल्याने तसेच दोन राज्यांमध्ये भाजपची आघाडी दाखवणारे एक्झिट पोल, कर संकलनातील मजबूत वाढ आणि आठ प्रमुख उद्योगांमधील सुधारित कामगिरीमुळेही बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. यामुळे NSE निफ्टी ५० ला नवीन विक्रमी उच्चांक गाठण्यासाठी बळ मिळाले.

परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले

परदेशी गुंतवणूकदार (FII) सलग चौथ्या सत्रात खरेदीदार राहिले. NSDL च्या आकडेवारीनुसार त्यांनी सुमारे १० हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, ३० नोव्हेंबर रोजी त्यांनी सुमारे ८,१५० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Closing Bell)

जीडीपीत वाढ

भारताने सप्टेंबर तिमाहीत ७.६ टक्के जीडीपी वाढ नोंदवून सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. मुख्यतः उत्पादन क्षेत्राच्या दमदार कामगिरीमुळे अर्थव्यवस्थेने मोठी उभारी घेतली आहे. ताज्या जीडीपी (GDP) आकडेवारीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतविषयक धोरण समितीच्या अंदाजाला मागे टाकले आहे. २०२४ मधील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा वेग ७.८ टक्के आणि २०२३ च्या दुसर्‍या तिमाहीत ६.३ टक्के होता.

Back to top button