Gold prices Today | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात बदल! जाणून घ्या आजचा दर | पुढारी

Gold prices Today | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात बदल! जाणून घ्या आजचा दर

पुढारी ऑनलाईन : धनत्रयोदशी (Dhanteras) दिवशी सोने- चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.१०) सोन्याच्या दरात बदल झाला आहे. शुद्ध सोन्याच्या दरात आज ३४८ रुपयांनी वाढ झाली आहे. आज शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६०,४४५ रुपयांवर खुला झाला. काल गुरुवारी हा दर ६०,०९७ रुपयांवर बंद झाला होता. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा प्रति किलो दर कालच्या ७०,३०० रुपयांच्या तुलनेत आज ७०,८५० रुपयांवर खुला झाला. (Gold prices Today)

संबंधित बातम्या 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६०,४४५ रुपये, २२ कॅरेट ५५,३६८ रुपये, १८ कॅरेट ४५,३३४ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३५,३६० रुपयांवर खुला झाला आहे.

दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही आज सोन्याच्या दरात बदल दिसून आला आहे. आज MCX वर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,८२० रुपयांवर खुला झाला. यानंतर दर ०.२२ टक्क्यांनी घसरून ६०,१५० रुपयांवर आला. तर चांदीच्या दरात ०.२४ टक्क्यांनी घट होऊन दर प्रतिकिलो ७१,०४३ रुपयांवर आहे.

सोने खरेदीची परंपरा

दिवाळीत धनत्रयोदशी दिवशी भारतात सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. भारतीय लोक या दिवशी सोने खरेदी करतात; कारण ते शुभ मानले जाते. विशेषतः, हिंदू आणि जैन संस्कृतीत प्राचीन काळापासून सोन्याची पूजा केली जाते. सोने खरेदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. (Gold prices Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button