Diwali 2023 | प्रकाशपर्वाला उत्साहात प्रारंभ | पुढारी

Diwali 2023 | प्रकाशपर्वाला उत्साहात प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पाच दिवस चालणार्‍या दीपावलीच्या प्रकाशपर्वाला गुरुवारी वसुबारसने दिमाखात प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण अशी दिवाळीची ओळख. आनंदपर्वातील पहिल्या दिवशी, गुरुवारी वसुबारस सर्वत्र साजरी करण्यात आली. गोरज मुहूर्तावर गाय-वासराचे पूजन करण्यात आले. (Diwali 2023)

दिवाळीनिमित्त सर्वत्र खरेदीची लगबग सुरू आहे. शहरातील रस्ते गर्दीने व्यापले आहेत. खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घरोघरी दिवाळी फराळाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कपडे, फटाके, रोषणाई, सजावटीचे साहित्य, आकाशदिवे खरेदीकडेही पावले वळत आहेत. गुरुवारी सायंकाळी अंबाबाई मंदिरासह शहरात विविध ठिकाणी वसुबारसनिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी गाय-वासराचे पूजन व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांच्या हस्ते झाले.

पांजरपोळ येथे गर्दी

पांजरपोळ संस्थेकडे 325 हून अधिक जनावरे आहेत. यामध्ये 250 हून अधिक गाय व वासरे आहेत. संस्थेकडून त्यांचे पालनपोषण होते. वसुबारसनिमित्ताने गुरुवारी पाचशेहून अधिक नागरिकांनी येथे भेट दिली. येथील भटक्या जनावरांसाठी नागरिकांकडून डाळ, गूळ, गवत तसेच रोख स्वरूपात मदत देण्यात आली. यावेळी संचालक बाळासाहेब मन्नाडे, अरविंद वर्धमाने, डॉ. राजकुमार बागल, वैशाली पिसे उपस्थित होते.

शहरातील रस्ते गर्दीने व्यापले

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे. रात्री कपडे व साहित्य खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. दिवसभर महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरीत नागरिकांची गर्दी होती. शहरातील प्रमुख रस्तेही गर्दीने फुलले होते. बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू होती. (Diwali 2023)

जिल्ह्यातील गांधीनगर, इचलकरंजी, वारणा, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, हातकणंगले, कागल, मुरगूड, पेठवडगाव, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, मलकापूर, आंबा, पन्हाळा, गारगोटी, मुदाळतिट्टा, राधानगरी बाजारपेठेतही चैतन्य होते.

Back to top button