Stock Market Closing | शेअर बाजार सपाट, सेन्सेक्स ६२,७९२ वर बंद, IT स्टॉक्स गडगडले | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजार सपाट, सेन्सेक्स ६२,७९२ वर बंद, IT स्टॉक्स गडगडले

पुढारी ऑनलाईन : गेल्या दोन सत्रांमध्ये नफा नोंदवल्यानंतर संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान मंगळवारी भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला घसरण आणि त्यानंतर सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) सपाट झाले. सेन्सेक्स आज ५ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६२,७९२ वर बंद झाला. तर निफ्टी १८,५९९ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात आयटी आणि बँकिंग स्टॉक्सनी निराशा केली. (Stock Market Closing)

‘हे’ शेअर्स वाढले, ‘हे’ घसरले

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, मारुती, एम अँड एम, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टायटन हे शेअर्स वाढले. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले.

आयटी स्टॉक्समध्ये विक्रीचा मारा

अमेरिका स्थित IT कंपनी EPAM ने कमी प्रमाणात तिमाही महसूल वाढ मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय आयटी स्टॉक्स घसरले. आयटी कंपन्यांसाठी मागणी कमकुवत झाल्याने आयटी स्टॉक्समध्ये विक्रीचा मारा दिसून आला. यामुळे Persistent Systems हा शेअर ५ टक्क्यांपर्यंत घसरला. तर Mphasis आणि कोफोर्ज हे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले. टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीस हे सुमारे १ टक्क्याने खाली आले.

कर्ज परतफेड, अदानी समूहातील शेअर्स तेजीत

आजच्या सत्रात अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स (Shares of Adani group) ३ टक्क्यांपर्यंत वाढले. अदानी समूहाने २.६५ अब्ज डॉलर कर्जाची परतफेड केल्याने अदानींचे शेअर्समध्ये सुधारणा झाली आहे. प्रीपेड कर्जामध्ये मार्जिन-लिंक्ड शेअर-बॅक्ड २.१५ अब्ज डॉलर वित्तपुरवठा समावेश आहे, जे कंपनीने १२ मार्च पर्यंत फेडले आहे. ३१ मार्च ही या कर्जाची अंतिम मुदत होती. या पार्श्वभूमीवर अदानी एंटरप्रायजेसचा (Adani Enterprises) शेअर्स ३ टक्क्यांनी वाढला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ५० मध्ये हा शेअर्स टॉपवर होता. अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, एसीसी, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्ही हे शेअर्स ०.३० ते २.८० टक्क्यांपर्यंत वाढले. अदानी ट्रान्समिशन या एकमेव शेअरने लाल चिन्हात व्यवहार केला.

जेके सिमेंटचा शेअर तेजीत

तोशाली सिमेंटसोबत शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता मिळाल्यानंतर जेके सिमेंटचा शेअर (JK Cement Share Price) BSE वर मंगळवारी सुमारे ४ टक्के वाढून ३,३२७ रुपयांवर पोहोचला. काहीवेळानंतर हा शेअर ३,२५० रुपयांवर स्थिरावला. (Stock Market Closing)

स्थानिक गुंतवणूकदारांकडून खरेदीवर जोर

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी ७०१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,१९६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

जागतिक बाजारातील स्थिती

गेल्या आठवड्यातील तेजीनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात सोमवारी घसरण झाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज (Dow Jones Industrial Average) ०.६ टक्के खाली आला. एस अँड पी (S&P 500) आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) मध्येदेखील घसरण झाली. दरम्यान, आशियाई बाजारातील स्थिती संमिश्र राहिली. हाँककाँगचा हँगसेंग सुमारे १ टक्क्यांहून अधिक वाढला. अलीबाबा आणि JD.com सारख्या चिनी टेक दिग्गज कंपन्यांच्या मजबूत कामगिरीमुळे हँगसेंग वधारला. शांघाय आणि तैपेई येथील बाजारदेखील वाढले. तर सिंगापूर, वेलिंग्टन, मनिला आणि जकार्ता येथील बाजारात घसरण दिसून आली.

 हे ही वाचा :

Back to top button