वित्त जाहिरात व सल्ला क्षेत्रात तातडीने नफा अथवा परतावा घेणार्यांपैकी 99% लोकांचे नुकसान व 1% लोकांचा फायदा होतो, हे वास्तव आहे. नुकसान ज्यांचे होते ते दुसर्या वित्तप्रभावकाच्या (Finfluencer) नादी लागतात व हा खेळ चालत राहतो. वित्तप्रभावकांच्या आचारसंहितेचा प्रश्न आता महत्त्वाचा झाला आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराने, विस्ताराने आता वित्त सल्लागारपेक्षा वित्तप्रभावक (Finfluencer) महत्त्वाचे ठरत आहेत. वित्तप्रभावक हे वित्तीय हे वित्तीय सल्ला प्रभावित करणारे 'सुप्रसिद्ध' व स्वयंसिद्ध अथवा स्वयंभू तज्ज्ञ असतात. त्यांचे लाखो 'भक्तगण' (फॉलोअर्स) असतात. अशाच एका फिनफ्ल्यूअन्सरवर सेबीने 46.8 लाखांचा दंड व सल्लाशुल्क 6 कोटी परत करण्याची कारवाई केली.
वित्तीय सल्लागार पी. आर. सुंदर व त्यांचे 3 सहकारी यांच्या व विविध व्हिडीओ आणि युट्यूबच्या आधारे अनेकांना सशुल्क सल्ला दिला. ज्यांना या सल्ल्याचा फायदा झाला, असे अनेक गुंतवणूकदार विश्वासाने सल्ला विकत घेऊ लागले. परंतु ज्यांचे नुकसान झाले, अशा तिघांनी सेबीकडे तक्रार केली व सेबीने हे नोंदणीकृत सल्लागार (RIA- Registered Investors Advisons) नसल्याने त्यांना 46.8 लाखांचा दंड व सल्ला की, 6 कोटी परत करण्याचा आदेश दिला व एक वर्षासाठी व्यवहारबंदी घातली.
अधिक परताव्याच्या शोधात असणार्यांना नेहमीच खात्रीलायक सल्लागारांची आवश्यकता असते. असा सल्ला मोफत मिळाला तर हवाच असतो. थोडी किंमत अथवा नफ्यात वाटा देण्यासही तयार असतात त्यांच्यासाठी असंख्य व्हिडीओ, युट्यूब, इन्स्टाग्राम, मासिके, वृत्तपत्रे यांचा रतीब चालू असतो. वित्तप्रभावक आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून गुंतवणूकदारांना आकर्षित करतात व त्यासाठी एका रीलसाठी किंवा काही सेकंदांच्या जाहिरातीसाठी 50 हजार ते लाख रुपये फी घेतात! अर्थातच, ज्यांचे 10 लाखपेक्षा अधिक फालोअर्स असतात त्यांना अधिक फी दिली जाते. या सर्व वित्त जाहिरात व सल्ला क्षेत्रात तातडीने नफा अथवा परतावा घेणार्यांपैकी 99% लोकांचे नुकसान व 1% लोकांचा फायदा होतो, हे वास्तव आहे. नुकसान ज्यांचे होते ते दुसर्या वित्तप्रभावकाच्या नादी लागतात व हा खेळ चालत राहतो. वित्तप्रभावकांच्या आचारसंहितेचा प्रश्न आता महत्त्वाचा झाला असून, सेबीच्या अध्यक्षा माधुरी बुच यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.
वित्तीय सल्ला देणार्यापैकी काही लोक चांगले असले तरी उर्वरित सल्लागार केवळ आपल्या लाभासाठी गुंतवणूक सल्ला देतात. ऑस्टेलियामध्ये विनापरवाना अथवा नोंदणी सल्ला देणार्यास 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा असून सिंगापूर, चीन येथेही कठोर शिक्षेची तरतूद आहे. वित्तीय सल्लागार व वित्तप्रभावक यांच्यातील अंतर अस्पष्ट असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम तपासणे महत्त्वाचे ठरते.
सातत्याने येणारे संदेश, युट्यूबवरील जाहिराती व झटपट श्रीमंतीसाठी खेळाचे आमंत्रण हे सर्व डिजिटल मार्केटिंगचे मोहजाल असून, यामध्ये तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात अडकत आहे. हमखास परतावा, शून्य जोखीम अशा प्रलोभनांसोबत संशोधन आधारित सल्ला इथपर्यंत वित्तप्रभावक कार्य करतात. क्रिप्टो किंवा बिटकॉइन व तशा प्रकारची गुंतवणूक, शेअर्समध्ये दिवसाचा व्यवहार, ऑप्शन व्यापार हे सर्व आता मोबाईलवर उपलब्ध असल्याने वित्तप्रभावकासाठी आचारसंहिता कशी असावी, याबाबत अनेक घटक महत्त्वाचे ठरतात.
सर्वात महत्त्वाचे, अशा सल्लागारांची नोंदणी व त्यांचे प्रावीण्य तपासणारी यंत्रणा जेवढी महत्त्वाची ठरते तेवढेच महत्त्वाचे त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवणारी सक्षम यंत्रणा महत्त्वाची ठरते. तक्रारदाराला संरक्षण हेही महत्त्वाचे ठरते. वित्तप्रभावकाची नेमकी व्याख्या ठरवतो, त्याची गुंतवणूक माहिती (पोर्टफोलियो) जाहीर करणे, सल्ला याची तांत्रिक व्याख्या करणे, वित्तीय ग्राहक व त्याचे अधिकार, जबाबदार्या ठरवणे या सर्व बाबी गुंतवणूक क्षेत्रातील या आधुनिक लुटारूंना नियंत्रित करण्यास आवश्यक ठरते!
गुंतवणुकीपूर्वी आवश्यक खबरदारी (Due Diligence) महत्त्वाचे असते. यासाठी स्वतःचा अभ्यास, सातत्यपूर्ण लक्ष ठेवणे हे आवश्यक ठरते. केवळ चमकदार जाहिरात, फसव्या यशोगाथा, 90% यशप्रमाण हे सर्व टाळणे व सेबी नोंदणीकृत, अभ्यास सातत्य असणारे सल्लागार निवडणे महत्त्वाचे. अर्थसाक्षरता अद्यापि 24% इतकी अल्प असल्याने सर्वसाधारण गुंतवणूकदारांचे संरक्षण अशा वित्तप्रभावकापासून करणे आवश्यक ठरते.
हेही वाचा :