Share Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, आजच्या विक्रीमागे 'हे' घटक ठरले कारणीभूत | पुढारी

Share Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टीत घसरण, आजच्या विक्रीमागे 'हे' घटक ठरले कारणीभूत

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील कर्ज मर्यादा डीलची चिंता आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमधील मॅन्युफॅक्चरिंगच्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज बुधवारी घसरण झाली. तसेच गुंतवणुकदारांचे भारतातील GDP आकडेवारीकडे लक्ष लागून राहिले आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ५४५ अंकांनी घसरून ६२,४२४ वर आला. तर निफ्टी (Nifty) १८,५४० वर राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ३४६ अंकांनी घसरून ६२,६२२ वर बंद झाला. तर निफ्टी ९९ अंकांच्या घसरणीसह १८,५३४ वर स्थिरावला. (Share Market Closing Bell)

‘हे’ होते टॉप लूजर्स

आजच्या व्यवहारात फायनान्सियल आणि बँकिग स्टॉक्सना सर्वांधिक फटका बसला. निफ्टी बँक ५५० अंकांनी म्हणजेच १.२४ टक्के घसरला. सेन्सेक्सवर आज कोटक बँक, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, सन फार्मा, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, विप्रो हे शेअर्स वाढले. तर ॲक्सिस बँक, एनटीपीसी, एसबीआय, रिलायन्स, पॉवर ग्रिड, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले.

फार्मा, आयटी स्टॉक्स तेजीत

बाजाराचा मूड खराब असतानाही फार्मा स्टॉक्स आज ६ टक्क्यांपर्यंत वाढले. AstraZeneca Pharma चा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारुन ३,५२७ रुपयांवर पोहोचला. टोरेंट फार्मास्युटिकल्स, सन फार्मास्युटिकल यांचे शेअर्सदेखील आज वाढले. तसेच बाजार कमकुवत असतानाही आयटी स्टॉक्स मजबूत दिसून आले. Cyient, कोफोर्ज, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट सिस्टम्स या शेअर्सनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. दरम्यान, आज बँकिंग स्टॉक गडगडले. यात ॲक्सिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, आरबीएल बँक हे टॉप लूजर्स होते.
मार्च २०२३ ला संपलेल्या तिमाहीत २८७ कोटीचा निव्वळ नफा नोंदवल्यानंतर टोरेंट फार्मा (Torrent Pharma) चे शेअर्स ८ टक्के वाढले. या कंपनीचा एका वर्षापूर्वी याच तिमाहीतील निव्वळ तोटा ११८ कोटी होता.

मेटल स्टॉक्स घसरले

ऑटो, FMCG, रियल्टी, ऑईल अँड गॅस हेदेखील घसरले. मेटलमधील हिंदोल्को, नॅशनल ॲल्यमिनियम, हिंदुस्तान झिंक, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टील, टाटा स्टील, Steel Authority of India यांचे शेअर्स घसरले होते. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅसही ३ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. (Share Market Closing Bell)

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) निर्देशांक घसरला. तर एस अँड पी ५०० सपाट अवस्थेत बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) ने काही प्रमाणात वाढून व्यवहार केला. जपानमधील निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग, शांघाय कंपोझिट यांनी आज लाल चिन्हात व्यवहार केला.

चीनमधील आर्थिक परिस्थिती

चीनमधील कमकुवत फॅक्टरी उलाढालीच्या डेटाने आर्थिक घसरणीचे संकेत दिले आहेत. यामुळे आशियातील बाजारात चिंता निर्माण झाली आहे. याचे पडसाद भारतीय बाजारातही उमटले आहेत. बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मागणी कमी झाल्याने मॅन्युफॅक्चरिंग उलाढालीचा वेग मंदावला आहे.

हे ही वाचा :

Back to top button