

पुढारी ऑनलाईन : जागतिक मजबूत संकेतांचा मागोवा घेत आज मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली होती. पण त्यानंतर बाजारात चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्सने (Sensex) आजच्या ट्रेडिंग सत्रात ६२ हजारांवर गवसणी घातली. गेल्या डिसेंबर नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्सने ६२ हजारांचा टप्पा पार केला. सेन्सेक्स आज सकाळच्या ट्रेडिंगमध्ये २५० अंकांनी वाढून ६२ हजारांवर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) १८,३०० वर राहिला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी तेजी गमावली आणि ते सपाट झाले. (Share Market Closing Bell) त्यानंतर सेन्सेक्स ६१,७६१ वर बंद झाला. तर निफ्टी १८,२६५ वर स्थिरावला.
बँक निफ्टी २०० अंकांनी तेजीत राहिला. आजच्या ट्रेडिंगमध्ये बाजारातील तेजीत फायनान्सियल, ऑईल आणि गॅस स्टॉक्स आघाडीवर राहिले. तर FMCG स्टॉक्स घसरले. realty स्टॉक्समधील Indiabulls Real Estate हा शेअर तब्बल १८ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्सवर आज इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, एम अँड एम, एचडीएफसी, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, विप्रो हे टॉप गेनर्स होते. तर आयटीसी, एसबीआय, बजाज फायनान्स, सन फार्मा, पॉवर ग्रिड, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले.
PSU bank स्टॉक्समध्ये आज घसरण दिसून आली. इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा हे शेअर्स टॉप लूजर्स होते. दरम्यान, २०२३ च्या चौथ्या तिमाहीत महानगर गॅसचा नफा २६८ कोटींवर पोहोचल्यामुळे त्यांचे शेअर्स सुमारे ८.५ टक्क्यांनी वाढले. हा शेअर आज १,०८८ रुपयांवर पोहोचला. तर मार्च तिमाहीत आयटी फर्म Birlasoft ने ११२ कोटी निव्वळ नफा कमावल्याने बिर्लासॉफ्टचे शेअर्स ४ टक्क्यांनी वधारले.
एप्रिल आणि मे मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय बाजारात केलेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी राहिली आहे. एफआयआयने एप्रिलमध्ये ५,७१२ कोटींच्या शेअर्सची खरेदी केली होती, तर मे मध्ये त्यांची खरेदी आतापर्यंत ७,६५२ कोटी रुपये इतकी आहे.
अमेरिका आणि आशियाई बाजारात संमिश्र संकेत आहेत. अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) ०.२ टक्के घसरला. तर एस अँड पी ५०० निर्देशांक ०.१ टक्के वाढला. नॅस्डॅक कंपोझिटने (Nasdaq Composite) ०.२ टक्के वाढून व्यवहार केला. आशियाई बाजारातील जपानचा निक्केई २२५ निर्देशांक २९२ अंकांनी वाढून २९,२४२ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक २६ अंकांनी वाढून २,०९७ वर स्थिरावला.
हे ही वाचा :