Stock Market Opening | शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी उडाले | पुढारी

Stock Market Opening | शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी उडाले

Stock Market Opening : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या भूमिकेमुळे कर्जदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहे. आज शुक्रवारी (दि.१०) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ८०० अंकांनी कोसळून ५९ हजारांपर्यंत खाली आला. तर निफ्टी १७,४०० च्या खाली आला. आज सर्व क्षेत्रात विक्रीचा सपाटा दिसत आहे. सेन्सेक्सच्या आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका बसला आहे. सर्व बीएसई सूचीबद्ध स्टॉक्सचे बाजार भांडवल २६१.२४ लाख कोटींवर आले आहे. जागतिक कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, एल अँड टी, बजाज फिनसर्व्ह हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि ॲक्सिस बँक हेदेखील घसरले आहेत. टाटा मोटर्स आणि भारतीय एअरटेल हे वाढून व्यवहार करत आहेत.

सुरुवातीच्या व्यवहारात युनियन बँक, यूको बँक आणि कॅनरा बँक यांना सर्वाधिक फटका बसला. हे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांत PSU बँक १.८५ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.६९ टक्क्यांने खाली आला. मेटल, फार्मा, रिअल्टी, consumer durables, एफएमसीजी आणि IT यांचेदेखील नुकसान झाले आहे.

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या संकेतांमुळे अमेरिकेतील शेअर बाजार गडगडला आहे. एस अँड पी ५००, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज आणि नॅस्डॅक कंपोझिट हे निर्देशांक घसरले आहेत. आशियाई बाजारातही शुक्रवारी कमकुवत स्थिती होती. जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँककाँगचा हँग सेंग घसरला आहे. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button