Stock Market Closing | घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स ४४८ अंकांनी वाढला, अदानींना मोठा दिलासा, जाणून घ्या तेजीचे कारण | पुढारी

Stock Market Closing | घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स ४४८ अंकांनी वाढला, अदानींना मोठा दिलासा, जाणून घ्या तेजीचे कारण

Stock Market Closing : सलग आठ सत्रांतील घसरणीनंतर बुधवारी (दि.१) भारतीय शेअर बाजारात तेजी परतली. जागतिक सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आज वधारला. सुरुवातीला सेन्सेक्स ३७० अंकांच्या वाढीसह ५९, ३३२ वर गेला. तर निफ्टी १७, ४०० वर होता. त्यानंतर आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला. दोन्ही निर्देशांकांची तेजी बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली. सेन्सेक्स ४४८ अंकांनी वाढून ५९,४११ वर बंद झाला. तर निफ्टी १४६ अंकांनी वाढून १७,४५० वर स्थिरावला. विशेष म्हणजे आज अदानी समूहाच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली.

निफ्टी PSU बँक सुमारे २ टक्क्याने वाढला

चीनमधील उद्योग पुन्हा पूर्वपदावर येत असल्याने आशियाई बाजारात सकारात्मक वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारातही तेजीचे वारे आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी PSU बँक सुमारे २ टक्क्याने वाढला. यात बँक इंडिया (३.८१ टक्के वाढ), इंडियन बँक (३.२१ टक्के), पंजाब नॅशनल बँक (२.९० टक्के), बँक ऑफ महाराष्ट्र (२.९४ टक्के), बँक ऑफ बडोदा (२.७४ टक्के), कॅनरा बँक (२.३३ टक्के), स्टेट बँक ऑफ इंडिया (१.८५ टक्के), पंजाब अँड सिंध बँक (२.७० टक्के) यांचा शेअर्सचा समावेश होता.

अदानींना मोठा दिलासा, एंटरप्रायजेसचा शेअर वधारला

तर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर आज १५ टक्क्यांपर्यंत वाढला. दुपारच्या सत्रात त्याने १२ टक्क्यांनी वाढून व्यवहार केला. काल मंगळवारी हा शेअर १४ टक्क्यांनी वाढला होता. तर आजच्या सत्रात तो १५ टक्क्यांपर्यंत वाढला. यामुळे तो १,५६७ रुपयांवर पोहोचला. या शेअरवर गेल्या सात दिवस विक्रीचा दबाव राहिला होता. पण हा शेअरने तोटा मागे टाकत पुन्हा उसळी घेतली आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात अदानींनी २० हजार कोटींचा एफपीओ मागे घेतला होता. हा शेअर गेल्या दोन दिवसांत वाढला असला तरी अद्याप तो ५२ आठवड्यांच्या (४,१८९ रुपये) उच्चांकी पातळीपासून ६० टक्क्यांनी खालीच आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अदानी ग्रीन, एनडीटीव्ही आणि अदानी पॉवर हेदेखील ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये राहिले आहेत. एकूणच अदानींच्या सर्व १० शेअर्समध्ये सकारात्मक मूड दिसून आला.

वेदांताचा शेअर सावरला

गेल्या आठ सत्रांत सलग वेदांताचा शेअर घसरला होता. पण बुधवारी त्यात सुधारणा दिसून आला. हा शेअर आज २ टक्क्यांने वाढला. कंपनीने कर्ज दायित्वांची पूर्तता करण्याचा विश्वास व्यक्त केल्यानंतर हा शेअर वाढला आहे. दरम्यान, झोमॅटोचा शेअर २.३४ टक्क्यांने वाढला.

हे शेअर्स वधारले

येस बँक (४.५८ टक्के वाढ), व्होडाफोन (०.०७४ टक्के), टाटा स्टील (१.२९ टक्के), वेदांता (१.५८ टक्के), अदांनी एंटरप्रायजेस (६.९० टक्के), आयडीएफसी फर्स्ट बँक (०.१८ टक्के), अदानी टोटल गॅस (३.४६ टक्के), अदानी पोर्ट्स (२.७० टक्के) हे शेअर्स वाढले होते. मारुती, टेक महिंद्रा, विप्रो, एशियन पेंट्स, कोटक बँक, रिलायन्स, एचडीएफसी, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, अल्ट्रा टेक, टायटन, इन्फोसिस, आयसीआयसीआय, आयटीसी हे शेअर्सही वधारले आहेत.

NSE निफ्टी निर्देशांकावर, अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को, अॅक्सिस बँक, एम अँड एम, टेक महिंद्रा हे आघाडीवर होते. पॉवर ग्रिड, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सिप्ला, एसबीआय लाइफ, टाटा कंझ्युमर, पॉवर ग्रिड हे घसरले. (Stock Market Closing)

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार असलेल्या चीनमधील उत्पादन प्रक्रिया वाढल्याच्या रिपोर्टमुळे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेलाच्या किमती वाढल्या. यामुळे जागतिक इंधनाच्या मागणीला चालना मिळाली. ब्रेंट क्रूड तेलाचा दर ०.५ टक्के वाढून प्रति बॅरल ८३.९० डॉलरवर गेला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button