'Dividend Yield फंडस् म्हणजे असे फंड जे मार्केटमधील सातत्याने, नियमितपणे डिव्हिंडड देणार्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. कंपन्या डिव्हिडंड कधी देतात? तर, जेव्हा त्या मोठा नफा कमावतात. म्हणजे आपली गुंतवणूक ही चांगल्या कंपन्यांमध्येच होते.
दीर्घ कालावधीमध्ये म्हणजे किमान पाच वर्षांच्या पुढील काळात महागाई दरावर मात करणारा परतावा देणारे गुंतवणुकीचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे इक्विटी किंवा शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स! हे गतकालीन आकडेवारीवरून निःसंदिग्धपणे सिद्ध करता येते आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसू लागला आहे. डिमॅटखाली उघडणार्यांची संख्या आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणार्यांची संख्या पाहून ही गोष्ट नक्कीच स्पष्ट होते.
आता एखादा व्यक्तीने शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि तिने हेसुद्धा गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितलेले ऐकले आहे की, फंडामेंटली चांगल्या कंपन्यांमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा आणि स्वस्थ राहा. आता ही व्यक्ती तर प्रथमच शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहे. मग, तिला फंडामेंटली स्ट्रॉग कंपन्या कुठल्या हे कसे शोधता येणार? शिवाय शेअर बाजारातील गुंतवणूक फलदायी होण्यासाठी त्या व्यक्तीने आणखी एका व्यूहरचनेविषयी ऐकलेले असते आणि ती व्यूहरचना म्हणजे Bye low-Sell High ! मग फंडामेंटली चांगली कंपनी निवडली, तरी आताचा तिचा बाजारभाव कमी आहे की जास्त आहे, हे तिला कसे कळणार?
त्या दोन्ही चिंता दूर करून नवख्या गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्यांचा शोध मार्गी लागावा, यासाठी एक अतिशय उत्कृष्ट फंड प्रकार आहे आणि Dividend Yield Funds हा एक इक्विटी फंडांचा उपप्रकार आहे. परंतु, नावावरून त्याच्या स्वरूपाविषयी सर्वसामान्यांचा गोंधळ उडवणाराही हा फंड आहे. लोकांना असे वाटते की, हे फंड नियमितपणे डिव्हिडंड देतात. परंतु, वस्तुस्थिती तशी नाही.
''Dividend Yield फंड म्हणजे असे फंड जे मार्केटमधील सातत्याने, नियमितपणे डिव्हिंडड देणार्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करतात. कंपन्या डिव्हिडंड कधी देतात? तर, जेव्हा त्या मोठा नफा कमावतात. म्हणजे आपली गुंतवणूक ही चांगल्या कंपन्यांमध्येच होते. पुढे आपण आणखी एक गोष्ट विशेषत्वाने समजून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे Dividend आणि Dividend Yield यामधील फरक! समजा, एखाद्या कंपनीने 50 टक्के डिव्हिडंड जाहीर केला. असा हा 50 टक्के डिव्हीडंड म्हणजे नेमकी रक्कम किती होते? तर त्यासाठी त्या शेअरची Face Value म्हणजे मूळ किंमत किती ते पाहावे लागते.
ती नेहमी 1, 2, 5 किंवा 10 रुपयांच्या स्वरूपात असते. वरील उदाहरणात समजा या कंपनीच्या शेअरची Face Value 10 रुपये आहे आणि कंपनीने प्रतिसमभाग 5 रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. (डिव्हिडंड हा नेहमी प्रती समभाग म्हणजे Per share दिला जातो) 10 रुपयांच्या शेअरमागे 5 रु. म्हणजे 50 टक्के डिव्हिडंड होतो. परंतु, डिव्हिडंड दर वेगळा आणि त्या डिव्हिडंड पासून आपल्याला मिळणारे अंतिम निव्वळ उत्पन्न वेगळे! वरील उदाहरणात समजा त्या शेअरची Face Value 10 रुपये असली आणि तिचा बाजारभाव 100 रुपये असेल, तर 100 रु.च्या एका शेअरमागे 5 रु. डिव्हिडंड म्हणजे 5 टक्के आपले निव्वळ उत्पन्न झाले. यालाच डिव्हीडंड थ्रील्ड म्हणतात.
High Dividend Yield मिळविण्यासाठी फंड मॅनेजरला भरघोस डिव्हिडंड देणार्या, परंतु काही कारणांमुळे मार्केटमध्ये Underperform करणार्या कंपन्या शोधून त्यामध्ये गुुंतवणूक करावी लागते. भरपूर डिव्हिडंड देणार्या कपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीमधून Capital Appreciation फार होत नाही. म्हणजे आपल्याला अधूनमधून डिव्हिडंडच्या स्वरूपात परतावा मिळत राहिल्याने मूळ भांडवलात फारशी वाढ होत नाही. त्यासाठी फंड मॅनेजर डिव्हिडंड देणार्या कंपन्यांमध्ये 80 टक्के गुंतवणूक आणि Growth कंपन्यांमध्ये उर्वरित गुंतवणूक करतो.
इथे गुंतवणूकदारांनी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, फंडाची गुंतवणूक डिव्हिडंड देणार्या कंपन्यामध्ये होत असली, तरी फंड तुम्हाला नियमित आणि ठरावीक डिव्हिडंड देईलच असे नाही; परंतु तुम्हाला तुमची गुंतवणूक आर्थिकद़ृष्ट्या सक्षम, स्थिर अशा कंपन्यांमध्ये केल्याचे समाधान नक्कीच मिळेल.
या पार्श्वभूमीवर SBI म्युच्युअल फंडाने आपला SBI Dividend Yield Fund हा नवीन फंड बाजारात आणला आहे. 20 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 हा त्याचा प्रारंभिक गुंतवणूक कालावधी आहे. या कालावधीमध्ये जे या फंडात गुंतवणूक करतील, त्यांना 10 रु. प्रतियुनिटने गुंतवणुकीची संधी मिळेल. Nifity 500 Tri हा या फंडाचा बॅचमार्क इंडेक्स असून रोहित शिंपी आणि मोहीत जैन हे फंड मॅनेजर आहेत.
या फंडाची जाहिरात करताना कंपनीने या फंडामध्ये गुंतवणूक करून SWP चा अवलंब केला, तर किती कर बचत होते त्याचे उदाहरण दिले आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागारांकडून त्याची अधिक माहिती अवश्य घ्यावी.
भरत साळोखे