Stock Market Closing | परदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल, खरेदीवर जोर, अदानींचे ६ शेअर्स घसरणीतून सावरले! | पुढारी

Stock Market Closing | परदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल, खरेदीवर जोर, अदानींचे ६ शेअर्स घसरणीतून सावरले!

Stock Market Closing : शेअर बाजारात आज बुधवारी (दि.१५) दिवसभर चढ-उतार दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २५० अंकांनी घसरून ६१ हजारांच्या खाली आला होता. तर निफ्टी १७,८०० वर होता. त्यानंतर दुपारपर्यंत दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर राहिले. त्यानंतर सेन्सेक्स २४२ अंकांनी वाढून ६१,२७५ वर बंद झाला. तर निफ्टी ८६ अंकांच्या वाढीसह १८,०१५ वर स्थिरावला. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील महागाई दर आहे तसाच राहणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेत जानेवारीतील महागाई दर ६.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे दीर्घकाळपर्यंत उच्च व्याजदर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम काही प्रमाणात आज शेअर बाजारात दिसून आला.

आजच्या व्यवहारात आयटीसी, एचयूएल, एल अँड टी, बजाज फायनान्स, टीसीएस यांचे शेअर्स टॉप लूजर्स होते. हे शेअर्स ०.५ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. इन्फोसिस, टायटन, विप्रो, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड हे शेअर्सदेखील खाली आले. दरम्यान, रिलायन्स, टाटा स्टील, भारती एअरटेल आणि एम अँड एम हे शेअर वधारले. १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ११ निर्देशांक घसरले.

अदानींच्या ६ शेअर्समध्ये सुधारणा

अदानी समूहातील ४ शेअर्स वगळता अन्य ६ शेअर्स वधारल्याचे दिसून आले. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर हे शेअर्स ५ टक्क्यांच्या लोअर सर्क्रिटमध्ये गेले आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस (२.४७ टक्के), अदानी पोर्ट्स (१.३१ टक्के), अदानी विल्मर (१.५३ टक्के), अंबुजा सिमेंट्स (३.४२ टक्के), एसीसी सिमेंट (१.५७ टक्के), एनडीटीव्ही (२.५५ टक्के) या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. गेल्या १५ सत्रातील घसरणीमुळे अदानी समूहाचे बाजार भांडवलात घट होऊन १०.४५ लाख कोटींचा फटका बसला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा कल बदलला, खरेदीवर जोर

भारतातील सकारात्मक कल म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदीकडे वळले आहे. NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (दि. १४) परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) १,३०५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) २०४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या महिन्यात १४ फेब्रुवारी पर्यंत परदेशी गुंतवणूकरांनी एकूण २,७८६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. तर याच कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ७,१७९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. जानेवारी महिन्यात, FII ने ४१,४६४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तर DII ने ३३,४११ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

दरम्यान, मंगळवारी अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले. तर आशियाई बाजारात घसरण झाली आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक १.४३ टक्के घसरला. (Stock Market Opening) तर निक्केई निर्देशांक १०० अंकांनी घसरून २७,५०१ वर बंद झाला. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

Back to top button