Share Market Updates | IT स्टॉक्स तेजीत, पण अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २६ टक्क्यांनी गडगडला | पुढारी

Share Market Updates | IT स्टॉक्स तेजीत, पण अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २६ टक्क्यांनी गडगडला

Share Market Updates : अर्थसंकल्पानंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक सावरले आणि त्यांनी स्थिर पातळीवर व्यवहार केला. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ९० अंकांच्या घसरणीसह ५९,६१७ वर होता. तर निफ्टीने १७,५५४ वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स २२४ अंकांनी वाढून ५९,९३२ वर बंद झाला. तर निफ्टी १७,६१० वर स्थिरावला. आज दिवसभर शेअर बाजारात चढ- उतार दिसून आला.

अदानींना ८.३ लाख कोटींचा फटका

अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण कायम आहे. अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गच्या १०६ पानांच्या अहवालामुळे अदानी समूहाला १०० अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. अदानी शेअर्समधील गुंतवणूकदारांच्या खिशातून हे पैसे गेले आहेत. हिंडेनबर्गचा रिपोर्ट गेल्या बुधवारी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर गेल्या सहा सत्रांत अदानींचे शेअर्स कोसळले आहेत. यामुळे अदानी समूहातील १० कंपन्यांच्या बाजार भांडवलात ४३ टक्क्यांनी घट झाली आहे. हे नुकसान ८.३ लाख कोटींचे (१०० अब्ज डॉलर) आहे. अदानी समूहातील बाजार भांडवल १९.२ लाख कोटींवरून १०.८९ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे.

अंबुजा वगळता अदानींचे शेअर्स घसरले

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात अंबुजा सिमेंट वगळता अदानी एंटरप्रायजेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, एसीसी हे शेअर्स घसरले. बँकिंग शेअर्समध्येही घसरण झाली आहे. आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, बंधन बँक, स्टेट बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक हे शेअर्स खाली आले आहेत. (Share Market Updates)

FPO मागे घेतला, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २६ टक्क्यांनी गडगडला

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. याचा मोठा फटका अदानी समूहाला बसला आहे. आता अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज २६ टक्क्यांनी खाली आला. तर अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले.

हे टॉप होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

ऑटो शेअर्समध्ये आज संमिश्र व्यवहार झाले. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टीव्हीएस मोटर्स, आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो यांचे शेअर्स घसरले. तर अशोक लेलँड, मारुती सुझूकी, एस्कॉर्ट्स कुबोटा यांचे शेअर्स वधारले होते. सेन्सेक्सवर आयटीसी, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि टीसीएस हे टॉप गेनर्स होते. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ((SBIN), आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक हे टॉप लूजर्स होते.

NSE निफ्टी निर्देशांकावर, ITC, ब्रिटानिया, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि एम अँड एम हे आघाडीवर होते. अदानी एंटरप्रायझेस, यूपीएल, एचडीएफसी लाइफ, हिरो मोटोकॉर्प आणि एनटीपीसी हे घसरले होते.

IT स्टॉक्स तेजीत

आज बाजारात अस्थिर वातावरण राहिले असले तरी आयटी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. एल अँड टी टेक्नॉलॉजीस सर्व्हिसेस (२.६१ टक्के वाढ), इन्फोसिस (१.७१ टक्के वाढ), एचसीएल (१.३८ टक्के वाढ), विप्रो (१.२३ टक्के वाढ), टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (१.२२ टक्के वाढ) हे आयटी स्टॉक्समध्ये पुढे होते.

हे ही वाचा :

Back to top button