

Dream Job
नवी दिल्ली: तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की रिकाम्या वेळेत आवडीने केली जाणारी एखादी गोष्ट जसे की आकाशातून पळणाऱ्या ढगांकडे एकटक पाहत राहणे लाखो रुपये कमावण्याचे साधन बनू शकते? होय, हे काही काल्पनिक किंवा स्वप्न नाही; हे अगदी वास्तव आहे.
एका २३ वर्षांच्या तरुणाला अशीच एक अनोखी नोकरी मिळाली, ज्यामध्ये त्याला केवळ सुंदर पर्वतीय दऱ्यांमध्ये राहायचे होते, निवांत बसून ढगांचे निरीक्षण करायचे होते आणि त्यांचे अप्रतिम व्हिडिओ बनवायचे होते. या अनोख्या कामासाठी त्याला महिन्याला ८.५ लाख रुपयांचे भरघोस मानधन मिळते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एखाद्या मोठ्या कंपनीत '९ ते ५'ची डेस्क जॉब किंवा संगणकासमोर बसून काम करणे पसंत करतात. मात्र, या तरुणाने एक वेगळी वाट निवडली, जी आता अनेकांसाठी 'स्वप्नवत नोकरी' ठरली आहे. चीनच्या हेनान प्रांतातील लाओजुन पर्वतावर ली सिचेन या २३ वर्षीय व्लॉगरने ही अनोखी नोकरी स्वीकारली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत, त्याने 'क्लाउडस्केप ऑब्झर्व्हर' (ढगांच्या दृश्यांचे निरीक्षक) म्हणून काम केले आणि ढग व धुक्याचे निरीक्षण केले. या नोकरीदरम्यान, त्याने पर्वतांचे विहंगम दृश्य आणि ढगांचे व्हिडिओ टिपले. या कामासाठी त्याला ६०,००० युआन (सुमारे ८.५ लाख रुपये) इतकी मोठी रक्कम मिळाली.
ढगांकडे पाहणे जरी सोपे वाटत असले, तरी ली सिचेनचा कामाचा सुरूवात पहाटे ५ वाजता, म्हणजेच सूर्योदयापूर्वीच सुरू व्हायची. तो दिवसभर आणि सूर्यास्तानंतरही बराच वेळ पर्वत, ढग, धुके आणि प्रकाश यांचे व्हिडिओ चित्रित करण्यात घालवायचा. त्या पर्यटन स्थळासाठी विविध कोनातून अनेक सुंदर व्हिडिओ रेकॉर्ड करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. या अनोख्या नोकरीसाठी कठोर परिश्रमांची गरज होती; अनेकदा त्याला रात्री उशिरापर्यंत कंटेंट तयार करावा लागत असे. या कामादरम्यान, लीने ड्रोन चालवण्यापासून ते व्हिडिओ एडिटिंग आणि कलर ग्रेडिंगपर्यंतची नवीन तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली. त्याच्या या मेहनतीने हे सिद्ध केले की, प्रत्येक 'स्वप्नवत नोकरी'मागे प्रचंड मेहनत आणि समर्पण दडलेले असते.
डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या आजच्या युगात, करिअरच्या व्याख्येमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. डॉक्टर, अभियंता किंवा वकील बनणे हाच आता उपजीविकेचा एकमेव मार्ग राहिलेला नाही; तर पर्यटन, प्रवासाशी संबंधित कंटेंट निर्मिती आणि निसर्गाविषयक ब्लॉगिंग यांसारख्या क्षेत्रांतही प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत.
निसर्गाबद्दलची आपली आवड आणि ओढ यांना योग्य दिशा देऊन, या तरुणाने असंख्य युवक-युवतींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कामाचा ताण आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे शहरी जीवनात अनेकदा तणाव निर्माण होतो; त्याउलट, पर्वतांवरील ताज्या हवेत काम करणे हे आरोग्य आणि आर्थिक उत्पन्न या दोन्ही दृष्टींनी फायदेशीर ठरते. निसर्गाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि कॅमेरा हाताळण्याचे उत्तम कौशल्य हे या कामातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत.