Proteinuria | समस्या प्रोटिन्युरियाची...

Kidney Disease Symptoms |
Kidney Disease Symptoms | समस्या प्रोटिन्युरियाची...
Published on: 
Updated on: 

डॉ. भारत लुणावत

लघवी करताना फेस होणे ही वरवर साधी वाटणारी बाब असली, तरी अनेकदा हे मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजाराचे प्राथमिक लक्षण ठरू शकते.

लघवीतून प्रथिनांचे (प्रोटीन) प्रमाण वाढल्यामुळे सामान्यतः फेस दिसून येतो. निरोगी मूत्रपिंड रक्तातील उपयुक्त प्रथिने शरीरातच रोखून ठेवतात. मात्र, मूत्रपिंडाच्या गाळणयंत्रणेला (ग्लोमेरुली) इजा पोहोचल्यास प्रथिने लघवीवाटे बाहेर पडू लागतात, ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘प्रोटीन्युरिया’ म्हटले जाते. दीर्घकाळ अनियंत्रित राहिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही या समस्येची मुख्य कारणे ठरतात. यामुळे मूत्रपिंडातील सूक्ष्म रक्तवाहिन्या आणि गाळणयंत्रणा निकामी होऊ लागते. याशिवाय ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’सारख्या मूत्रपिंडाच्या विशिष्ट आजारांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गळती होते. त्याचे नेमके कारण शोधण्यासाठी डॉक्टर मूत्रपिंडाची बायोप्सी करण्याचा सल्ला देऊ शकतात.

प्रत्येक वेळी लघवीतून प्रथिने बाहेर पडणे म्हणजे मूत्रपिंडाचा कायमस्वरूपी आजार असतोच असे नाही. तीव्र ताप, संसर्ग किंवा अतीव शारीरिक श्रम आणि जड व्यायामानंतर तात्पुरत्या स्वरूपात प्रथिनांची पातळी वाढू शकते. संबंधित कारण दूर झाल्यानंतर ही पातळी पूर्ववत होते. त्यामुळे अहवालात प्रथिने दिसल्यास घाबरून न जाता डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे ठरते.

लघवीतील फेस सहजासहजी न विरघळल्यास ती प्रथिनांची उपस्थिती दर्शवणारी शक्यता असते. तरीही केवळ फेसावरून अंतिम निष्कर्ष काढता येत नाही. लघवीची अतिजलद धार अथवा स्वच्छतागृहातील रसायनांमुळेही तात्पुरता फेस निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रयोगशाळेतील चाचणीद्वारेच खात्री करणे योग्य ठरते.

शरीरातून अतिरिक्त प्रथिने वाहून गेल्यामुळे रक्तातील प्रथिनांचे प्रमाण खालावते. परिणामी, शरीरातील पेशींमध्ये पाणी साचू लागून पाय, घोटे आणि डोळ्यांभोवती सूज निर्माण होते. विशेषतः सकाळी उठल्यानंतर चेहर्‍यावर किंवा डोळ्यांखाली दिसणारी सूज मूत्रपिंडाच्या समस्येचा इशारा देऊ शकते. अर्थात, हृदय अथवा यकृताच्या विकारांमध्येही अशी सूज येत असल्याने इतर लक्षणांचा एकत्रित विचार केला जातो.

तपासणी आणि उपचारांची दिशा

लघवीच्या सर्वसामान्य तपासणीत प्रथिनांचे प्रमाण समजते. सूक्ष्म मूल्यांकनासाठी ‘यूएसीआर’ (युरिन अलब्युमिन टू क्रिएटिनिन रेशो) ही चाचणी अत्यंत उपयुक्त ठरते. यात अलब्युमिन आणि क्रिएटिनिनचे गुणोत्तर मोजले जाते. हे प्रमाण ३० पेक्षा कमी असणे सामान्य मानले जाते; तर ३० ते ३०० पर्यंत वाढलेले आणि ३०० पेक्षा अधिक असल्यास धोकादायक समजले जाते. सातत्याने हे प्रमाण वाढलेले राहिल्यास मूत्रपिंडाला झालेली हानी स्पष्ट होते.

या समस्येवर कोणताही एकच सरसकट उपचार नसतो. मूळ कारणावर उपचार करणे हाच खरा मार्ग आहे. समस्या मधुमेह किंवा उच्च रक्तदाबामुळे उद्‌भवली असल्यास हे आजार काटेकोर नियंत्रणात ठेवावे लागतात. सूज नियंत्रणासाठी डॉक्टर आहारात मिठाचे प्रमाण कमी करण्याचा आणि विशिष्ट औषधांचा सल्ला देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.