

या पक्षाघातात जन्मजात व अधिग्रहित असे दोन प्रकार असतात. जन्मजात पक्षाघातात गर्भातच असताना बाळाच्या पापणीच्या स्नायूंमध्ये दोष असतो. बाळामध्ये लिवेटर स्नायू अशक्त असतो, त्यामुळे बाळाच्या डोळ्याची वरची पापणी बुबळापर्यंत झाकलेली दिसते. त्यामुळे अशा बाळांना समोर पाहताना मान मागे झुकवून पाहावे लागते.
(Paralysis Of Eyelids)
वेळीच इलाज न झाल्यास दृष्टीअस्पष्टता किंवा मंद दृष्टीचा दोष निर्माण होतो. तर अधिग्रहित पक्षाघातामध्ये एपोन्यूरोटिक, न्यूरोजनिक, मायोजेनिक, मेकॅनिकल, ट्रॉमेटिक या प्रकारचे पक्षाघात असतात. या सर्व प्रकारांमध्ये लेव्हलेटर स्नायू खेचले जाणे; तसेच पापण्यांच्या स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसांमध्ये समस्या आली, तर डोळ्यांना हा त्रास संभवतो.
एक किंवा दोन्ही पापण्या बुबळावर मिटल्यासारख्या होणे हे सुरुवातीचे लक्षण असते. यामुळे दृष्टिदोषही निर्माण होऊ शकतो. अर्थात, हा सर्वसाधारणपणे दिसून येणारा विकार नाही. टोसिसमुळे डोळे कोरडे होतात किंवा डोळ्यात सतत पाणी येते कारण पापण्या डोळ्यांना ओलसर ठेवू शकत नाहीत.
डोळ्यांची वरची पापणी बुबुळाला झाकून टाकते तेव्हा दृष्टिबाधा निर्माण होते. ज्यांच्या विकाराने गंभीर पातळी गाठलेली असते, त्यांना समोर पाहताना मान मागे झुकवून पाहावे लागते. त्याशिवाय डोळे थकणे, आजूबाजूला वेदना जाणवणे हीदेखील टोसिसची लक्षणे आहेत. पाहताना भुवई वर उचलून पाहायचा प्रयत्न केला जातो.
आयलिड टोसिस होण्याची विविध कारणे असतात. काही नवजात बालकांमध्ये एका किंवा दोन पापण्यांचा पिटोसिस आढळतो, तर काही आजार किंवा इजा झाल्यास पापण्या वर उचलणारे स्नायू किंवा स्नायूबंध अशक्त झाल्यास काही काळानंतरही पिटोसिस होऊ शकतो. पापण्यांच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांना झालेल्या इजेमुळेही पापण्या झुकण्याचे कारण ठरू शकतात.
पापण्या वर उचलणाऱ्या स्नायूंचा अशक्तपणा, त्वचा सैल पडणे... तसेच काही वेळा लासिक किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसारख्या उपचारांनंतरही पापण्या सैल पडू शकतात. त्या मिटल्यासारख्या होऊ शकतात. डोळ्यातला ट्यूमर, मधुमेह, हॉर्नर सिंड्रोम किंवा मायस्थेनिया ग्रेविससारख्या आजारांमुळे टोसिस होऊ शकतो.
यावरील उपचार हे रुग्णाची अवस्था, विकाराचे कारण यावर अवलंबून असतात. जन्मजात आजार असेल व नजरेवर परिणाम होणार नसेल, तर काही वेळा डॉटर काहीही न करण्याचा सल्ला देतात. कारण त्याने आरोग्याची काहीही हानी होणार नसते.
अर्थात, सौंदर्याला बाधक ठरत असेल तर डॉक्टर प्लास्टिक सर्जरीचा पर्याय सुचवतात. जर डॉटरांच्या लक्षात आले की, एखाद्या अंतर्गत आजाराचा परिणाम म्हणून डोळ्याची पापणी लवतेय, तर त्यावर उपचार सुचवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर टोसिस दृष्टीला बाधा आणत असेल, तर डॉटर शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवतात.
पापणी वर उचलणारे लेवेटर नावाचे स्नायू अशक्त असणे हे टोसिसचे सर्वसामान्य कारण आहे. त्यामुळे लेवेटर स्नायू घट्ट करण्याचे काम शस्त्रक्रियेद्वारे केले जाते. जेव्हा लेवेटर स्नायू पापण्यांना आधार देऊ शकत नाहीत तेव्हा पापणी आपोआप खाली येऊ लागते. तेव्हा पापण्यांना वर उचलण्यासाठी कपाळाच्या स्नायूंचा आधार घ्यावा लागतो. या शस्त्रक्रियेसाठी स्थानिक भूल दिली जाते. त्यानंतर टोसिस शस्त्रक्रिया केली जाते.
सर्वसाधारणपणे यात पापणीला चीर देऊन लेवेटर स्नायू शिवले जातात जेणेकरून पापणीला ताकद येईल. अर्थात, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रक्रिया स्नायूंचा अशक्तपणा पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. त्यामुळे टोसिसच्या शस्त्रक्रियेनंतर पापण्यांची कार्यक्षमता वाढली तरीही त्या पूर्ण बऱ्या होतील असे नाही. टोसिस काही वेळा अनुवांशिकही असू शकतो.