

भारतामध्ये चहाला एक वेगळंच स्थान आहे. सकाळची सुरुवात असो की सायंकाळची थकवा, चहा प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतो. त्यामुळेच 21 मे रोजी इंटरनॅशनल टी डे (International Tea Day) साजरा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे चहाचा इतिहास, महत्त्व आणि आरोग्याशी संबंधित जागरुकता निर्माण करणे.
परंतु अनेकदा लोक चहा पिताना काही सामान्य चुका करतात ज्या त्यांच्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. या चुकांमुळे ऍसिडिटी, झोपेचा अभाव, पचन तंत्र बिघडणे अशा समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया चहा पिताना कोणत्या 5 चुका टाळणं गरजेचं आहे.
उन्हाळ्यात किंवा सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिणे
रिकाम्या पोटी चहा घेतल्यास ऍसिडिटी, गॅस, जळजळ आणि मलावरोध (कॉन्स्टिपेशन) होऊ शकतो. त्यामुळे चहा पिण्याआधी थोडं गरम पाणी किंवा फळं खाणं फायदेशीर ठरतं.
अती प्रमाणात चहा पिणे
दिवसभरात अनेकदा चहा पिणं, विशेषतः 4–5 वेळा किंवा त्याहून अधिक, शरीरात कॅफीनचं प्रमाण वाढवतं. यामुळे झोपेत अडथळा, अस्वस्थता आणि थकवा येऊ शकतो. दिवसाला 2 कपांपेक्षा अधिक चहा टाळावा.
जास्त वेळ उकळलेली किंवा फार गडद चहा पिणे
काही लोक चहा चांगला सुगंध येईपर्यंत 10-15 मिनिटं उकळतात. यामुळे त्यातील टॅनिन्स आणि कॅफीन वाढते, जे पचनास त्रासदायक ठरते. चहा मध्यम उकळलेला आणि सौम्य ठेवणं उत्तम.
खाण्यानंतर लगेच चहा पिणे
अन्नानंतर लगेच चहा घेतल्यास अन्नातील लोह (आयरन) आणि इतर पोषक घटक शोषले जात नाहीत. त्यामुळे जेवल्यानंतर किमान 30-45 मिनिटांनीच चहा प्यावा.
चहामध्ये जास्त साखर घालणे
जास्त गोड चहा प्यायल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो. शक्य असल्यास कमी साखर वापरा किंवा त्याऐवजी गूळ, मध यांचा वापर करा.