

दूध आणि फळे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत पोषक मानल्या जातात. दूधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि विविध जीवनसत्त्वे असतात, तर फळांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. मात्र, या दोघांचा एकत्रित आहार प्रत्येकाच्या पचनसंस्थेसाठी योग्य ठरतोच असे नाही.
पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात
फळे हलकी असतात आणि लवकर पचतात, तर दूध जड असते आणि त्याचे पचन वेळ घेते. जेव्हा दोन्ही एकत्र घेतले जातात तेव्हा पचनक्रिया मंदावते. यामुळे पोटात गॅस, फुगवटा, अपचन, आणि अस्वस्थता होऊ शकते. याशिवाय, शरीरात अनारोग्यदायक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.
टॉक्सिन्स तयार होण्याचा धोका
आयुर्वेदानुसार, आंबट फळे जसे की संत्री, जामून इत्यादी फळे दूधासोबत कधीही खाऊ नयेत. यामुळे शरीरात विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स तयार होतात. यामुळे थकवा जाणवू शकतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमी होण्याची शक्यता असते.
त्वचेवर होतो परिणाम
जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. दूध आणि फळे योग्य प्रकारे न पचल्यास एक्ने, पुरळ, त्वचा कोरडी होणे किंवा चेहरा निस्तेज दिसणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मग काय करावं?
सर्वोत्तम उपाय म्हणजे दूध आणि फळे एकत्र न खाणे. त्यांच्यामध्ये किमान ३० मिनिटांचे अंतर ठेवावे. तरीही जर एकत्र घ्यायचेच असतील, तर केळे किंवा पक्के आंबे दूधासोबत घेतले जाऊ शकतात. त्यावेळीही दूध उकळून थंड केलेले असावे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.