

तीळ अत्यंत बहुगुणी असल्यामुळे परंपरेने जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात आणि प्रमाणात तिळाचा वापर होत आला आहे. शरीरक्रिया सुरळीत चालू राहाव्यात, संसर्ग / आजार/ रोगांपासून शरीराचं रक्षण व्हावं, यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांचा साठा तिळात असतो, तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं.
हाडांच्या, दातांच्या, हिरड्यांच्या आणि केसांच्या मजबुतीसाठी तीळ वरदान मानले जातात. चयापचय क्रिया सुव्यवस्थित असणं हे निरोगीपणाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. पचन आणि जठराग्नी सुधारणं, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करणं, मूळव्याधीचा त्रास शरीराला होऊ न देणं यासाठी तीळ प्रभावी ठरतो.
तिळामध्ये आढळणारं सेसमिन हे अँटिऑक्सिडेंट आहे, कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास ते मदत करतं. तिळाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करतं. तीळ खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहत असल्याचंही आढळून आलं आहे.
अशक्तपणा दूर करण्यासाठीही तीळ उपकारक मानला जातो. काही लोकांना पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे खूप लवकर अशक्त आणि थकल्यासारखं वाटू लागतं. अशा वेळी शरीरातील प्रोटिनची मात्रा पूर्ण करण्यासाठी तीळ उपयुक्त ठरू शकतात.
तणाव आणि नैराश्य दर ठेवण्यासाठी, कमी करण्यासाठी तिळामध्ये मुबलक प्रमाणात असलेली पोषकतत्त्वं प्रभावी ठरत असल्याचंही आढळून आलं आहे. काळ्या तिळांमध्ये प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबं, मॅगनीज आणि फायबर यांसारख्या महत्त्वपूर्ण व मानवी शरीरासाठी उपयुक्त घटकांचा समावेश असतो, त्यामुळे थंडीच्या दिवसांत खास करून हिवाळ्यात काळ्या तिळाचं सेवन करणं चांगलं मानलं जातं.
मरगळ झटकून उत्साह वाढवण्याचं काम तीळ त्याच्या अंगच्या बहुगुणांच्या मदतीने करत असतो. म्हणूनच केवळ हिवाळ्यातच नाही, तर सगळ्या ऋतूंमध्ये तिळाचा आणि तिळाच्या तेलाचा उपयोग विविध प्रमाणात, विविध स्वरूपात आणि विविध कारणांनी घरोघरी होण्यामागे तिळात अंतर्भूत असलेले हे पोषक घटकच कारणीभूत असणारः यात शंका ती काय?