

डॉ. भारत लुणावत
अलीकडील काळात विविध व्याधींवरील उपचारांसाठी म्हणा किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी म्हणा; पण आपल्या मूळच्या आहार घटकांखेरीज अन्य अनेक धान्य प्रकार, फळे, पदार्थ बाजारात दिसू लागले आहेत आणि अनेक जण त्याचा आस्वादही घेत आहेत. यापैकी एक म्हणजे क्विनोआ. ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वीपासून दलियाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले, तशाच प्रकारे आता क्विनोआचा ट्रेंड येऊ पाहत आहे.
क्विनोआला ‘सुपरफूड’ किंवा ‘सुपरग्रेन’ म्हटले जाते. जगातील सर्वांत लोकप्रिय आरोग्यदायी खाद्यपदार्थांमध्ये त्याचा समावेश होतो. प्रत्यक्षात क्विनोआ ही दक्षिण अमेरिकेतील अँडियन प्रदेशात आढळणारी राजगिरा प्रजातातील एक फुलांची वनस्पती आहे. भारतातही काही राज्यांत याची लागवड केली जाते. क्विनोआ एखाद्या डाळीसारखा दिसतो.
सर्व 9 आवश्यक अमिनो अॅसिडस् असल्याने क्विनोआ हा संपूर्ण प्रथिन स्रोत आहे. शाकाहारी आणि अन्नातून प्रथिन घेणार्यांसाठी याचे सेवन फायदेशीर ठरते. इतर धान्यांच्या तुलनेत ते अधिक पौष्टिक आणि रुचकर आहे. यामध्ये प्रथिने, तंतुमय घटक, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटस भरपूर प्रमाणात असतात. तसेच लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, जस्त, कॅल्शियम, फोलेट, जीवनसत्त्व बी 6, रिबोफ्लेविन, नियासिन, पँटोथेनिक अॅॅसिड, थायमिन, बायोटिन आणि जीवनसत्त्व ‘ई’ हे भरपूर प्रमाणात असतात. क्विनोआ ग्लुटेन मुक्त आहे. तसेच ऊर्जेचा चांगला स्रोत आहे.
एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे 200 कॅलरीज असतात. क्विनोआ दोन प्रकारांत मिळतो. यातील काळा क्विनोआ चवीला गोड असून शिजविण्यासाठी बराच वेळ लागतो. याउलट पांढरा क्विनोआ सर्वत्र मिळतो आणि शिजण्यासही कमी वेळ लागतो. परदेशांमध्ये याच्या पानांचा वापर सॅलेडमध्येही केला जातो. कारण त्यामध्ये बर्याच प्रकारची पोषक तत्त्वे असतात.
क्विनोआमध्ये सॅपोनिन नावाचे नैसर्गिक आवरण असते. त्याची चव कडू असल्याने वापर करण्यापूर्वी क्विनोआ 6 ते 8 तास पाण्यात भिजवून ठेवावा. त्यानंतर स्वच्छ धुऊन वापरावा. याचा वापर सॅलड, पोहे, उपमा बनवण्यासाठी करता येतो. तसेच त्याची पोळीही आहारात घेऊ शकता. याच्या सेवनाने पूर्ण दिवसाच्या पोषक तत्त्वांची गरज पूर्ण होते. याच्या सेवनाने लठ्ठपणाच्या समस्येवर बर्याच अंशी नियंत्रण मिळू शकते. यातील संपूर्ण प्रथिने चयापचय वाढवते. तसेच, यामध्ये असणारेे उच्च तंतूमय घटक पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात. यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी तो एक चांगला पर्याय ठरतो.
क्विनोआ ग्लूटेन-फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लूटेनची अॅलर्जी आहे किंवा सिलिअॅक डिसीज आहे, त्यांच्यासाठी तो आदर्श पर्याय आहे.