

डॉ. सुनील पाटील
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणार्या युगात अगदी लहान वयातील मुलेही मोबाईल हाताळताना सहज दिसतात. पूर्वी बाहेर खेळणारी, पुस्तकात रमणारी आणि घरच्यांशी संवाद साधणारी मुले आता तास न् तास मोबाईल स्क्रीनकडे नजर लावून बसलेली दिसतात. हा तंत्रज्ञानातील बदल खूप चिंताजनक आहे.
कोरोना महामारीनंतर शिक्षणासाठी सुरुवात झालेला मोबाईल वापर हळूहळू व्हिडीओ गेम्स, यूट्यूब, ओटीटी आणि सोशल मीडियावर केंद्रित झाला. आजच्या घडीला 6 ते 18 वयोगटातील मुले दिवसातून 5-7 तास किंवा अधिक वेळ मोबाईलवर घालवतात. अभ्यासाऐवजी रिल्स किंवा मोबाईल गेम्समध्ये त्यांचा वेळ जातो. हेच हळूहळू एक मानसिक व्यसन बनते.
1. एकाग्रतेचा अभाव : सतत बदलणार्या व्हिडीओज व सतत येणार्या नोटिफिकेशन्समुळे मुलांचे लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित राहत नाही. अभ्यासात गढून जाण्याऐवजी ते सतत मोबाईलकडे डोळा लावून असतात.
2. अभ्यासाकडे दुर्लक्ष : मोबाईलचा वापर एक वेळेला 10-15 मिनिटे म्हणून सुरू होतो; पण त्याचे व्यसन लागल्यावर तास न् तास गेम्स आणि व्हिडीओ पाहण्यात जातात. परिणामी, अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, गृहपाठ राहतो आणि परीक्षेच्या तयारीत बाधा येते.
3. शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम : मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण, झोपेचा अभाव, मानदुखी, अपचन, आळस आणि चिडचिड यासारख्या समस्या निर्माण होतात. झोपेचा वेळ कमी झाल्याने दिवसभर आळस येतो आणि कार्यक्षमता घटते.
4. सामाजिक व भावनिक अंतर : मोबाईलमध्ये रममाण झालेली मुले घरातील संवाद, मैत्री आणि सामाजिक परस्पर संबंधांपासून दूर जातात. त्यांचं भावनिक वर्तन आत्मकेंद्री, हट्टी किंवा आत्ममग्न होऊ लागतं.
5. अनुचित कंटेंटची भीती : अनेक वेळा मुले पालकांच्या नियंत्रणाशिवाय मोबाईल वापरत असल्याने त्यांच्यापर्यंत अश्लील, हिंसक किंवा चुकीचा मजकूर सहज पोहोचतो. यामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. या समस्येची कारणमीमांसा पालकांची व्यस्तता आणि वेळेअभावी मुलांना मोबाईल देणे हा एक सोपा उपाय मानला जातो. ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलचा नैसर्गिक वापर वाढला आणि त्याचाच सवयीचा भाग झाला. मनोरंजनाची अनेक पर्यायी साधने मोबाईलमध्येच उपलब्ध असल्याने मुले बाहेर जाण्यापेक्षा स्क्रीनमध्ये रमतात.
उपाय योजना पालकांनी ठरवलेला वेळ आणि नियम : मोबाईल वापरासाठी वेळ मर्यादित असावा. फक्त शैक्षणिक कारणांसाठी वापरण्याची सवय लावावी.
डिजिटल डिटॉक्सचे आयोजन : साप्ताहिक किंवा मासिक ‘नो मोबाईल डे’ ठेवावा. त्या दिवशी खेळ, वाचन, चित्रकला, संवाद असे पर्याय द्यावेत.
पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन : पालक आणि शिक्षकांनी मुलांशी संवाद साधत मोबाईलच्या दुष्परिणामाबाबत सजगता निर्माण करावी.
मोबाईल अॅप्सवर पालक नियंत्रण : पालकांनी मोबाईलमध्ये अॅप कंट्रोल वापरून मुलांचा वापर नियंत्रित ठेवावा.