

HbA1c Test
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह (डायबेटीस) हा एक सामान्य; पण गंभीर आजार बनला आहे. अनेकांना फक्त फास्टिंग व पोस्ट मील ब्लड शुगर चाचण्या माहीत असतात; पण एचबीए१सी ही एक खूप महत्त्वाची तपासणी आहे, जी मधुमेह नियंत्रणात आहे की नाही, हे दाखवते.
एचबीए१सी महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते. जेव्हा शरीरातील साखर हिमोग्लोबिनशी (रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारे प्रथिन) जोडली जाते, तेव्हा एचबीए१सी तयार होते. त्यामुळे याचे प्रमाण जितके जास्त, तितकी मागील काही महिन्यांत साखर जास्त राहिल्याचे निदर्शक असते. सामान्यतः भारतात दिवाळीसारख्या सणांच्या काळात लोकांचा गोड आणि एकंदरीतच खाण्यावरचा ताबा सुटतो आणि त्यामुळे दिवाळीनंतरच्या काळात हमखास मधुमेहींचे एचबीए१सी केले असता शुगर वाढल्याचे दिसून येते.
ही तपासणी मधुमेहाच्या रुग्णांमध्ये त्यांच्या रक्तातील साखरेचे दीर्घकालीन नियंत्रण योग्य आहे की नाही हे दाखवते. डॉक्टरांनी दिलेली औषधे व आहार-व्यायाम यांचा परिणाम किती झाला आहे, हे कळते.
एचबीए१सीचे प्रमाण सातत्याने जास्त राहिले, तर डोळ्यांचे, मूत्रपिंडाचे, हृदयाचे व नसांचे विकार होण्याचा धोका वाढतो. काही वेळेस ही तपासणी मधुमेहाचे निदान करण्यासाठी वापरली जाते.
५.६% पेक्षा कमी - सामान्य
५.७% - ६.४ टक्के - प्री-डायबेटीस (पूर्व अवस्था)
६.५% किंवा त्याहून अधिक डायबेटीस
टीप : मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी एचबीए १सीची पातळी सहा टक्क्यांच्या खाली आणणे हे लक्ष्य असते.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दर ३ ते ६ महिन्यांनी ही तपासणी करणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण सतत अनियमित असते, तर ही तपासणी अधिक वेळा करावी. या तपासणीसाठी उपवासाची गरज नसते. तुम्ही नेहमीप्रमाणे अन्न व पाणी घेऊन रक्तचाचणी करू शकता.
रक्तस्राव झाला असेल, अॅनिमिया किंवा कोणतेही रक्तातील विकार असतील, गर्भावस्था असेल, तर एचबीए१सीचे मूल्य चुकीचे दर्शवू शकते.