

डॉ. संतोष काळे
डायबेटीस म्हणजे मधुमेह आपल्या देशात एक सर्वसामान्य आजार आहे. आपल्या देशातील दर पाच व्यक्तींमध्ये एक व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण असतो. मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. मधुमेहाच्या भीतीने अनेक जण साखर किंवा गोड पदार्थ खायचे टाळतात आणि मग अशी वेळ येते की, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणच कमी होऊन जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे जसे धोक्याचे असते, तसेच ते कमी होणेही तितकेच धोक्याचे असते. याविषयी...
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे धोक्याचे असते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये असा धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते; पण निरोगी व्यक्तींमध्येही हा धोका असतो. साखर किंवा ग्लुकोज आपल्या शरीरात उर्जा निर्माण करण्याचा मुख्य स्रोत आहे. ही साखर रक्ताच्या माध्यमातून आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांपर्यंत पोहोचते म्हणजे रक्तातील साखर आपल्या शरीराची मूलभूत गरज आहे. साखर कमी होण्याच्या स्थितीला हायपोग्लायसेमिया असे म्हणतात. या स्थितीत किडनीची समस्या, हेपेटायटिस, यकृताचे विकार, मानसिक संतुलन बिघडणे, अस्वस्थता, चक्कर येणे अशासारख्या अनेक समस्या निर्माण होतात.
लक्षणे कोणती?
पोटभर जेवण झाल्यानंतरही आपले पोट रिकामे आहे असे वाटणे किंवा कडकडून भूक लागणे हे आपल्या शरीराला आणखी ग्लुकोजची आवश्यकता आहे, याचे लक्षण आहे.
हायपोग्लायसेमिया हे निद्रानाशाचेही कारण असू शकते. रात्री घाम येत असेल, स्वप्ने पडत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर हे रक्तातील साखर कमी झाल्याचे लक्षण आहे.
अचानक मूड बदलणे हे रक्तातील साखर कमी झाल्याचे लक्षण असू शकते. आपल्या वर्तनात अचानक काहीतरी बदल झाला आहे, असे तुम्हाला जाणवले किंवा तुम्ही अस्वस्थ राहू लागलात, तर हे ग्लुकोज कमी होण्याचे लक्षण असू शकते.
शरीरातील साखर कमी होण्याचे हे सर्वात पहिले आणि नेहमीचे लक्षण आहे. अनेकदा तुम्ही बराच वेळ उपाशी असाल आणि शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले, तर तुम्हाला चक्कर येऊ लागते किंवा डोळ्यांसमोर अंधारी येते.
काही वेळा मधुमेहाच्या काही औषधांनीही रक्तातील साखर कमी होते. म्हणूनच ही औषधे घेताना त्यातील कोणती औषधे लो ब्लड शुगरशी निगडीत आहेत, हे डॉक्टरांना विचारणे आवश्यक असते.
तुम्ही इन्सुलिन जास्त प्रमाणात घेत असाल, तर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकते.
काय करावे?
तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्हाला आपल्या शरीरातील साखर कमी झाली आहे, असे वाटत असेल, तर आधी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून घ्या. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास सर्वात प्रथम जलद गतीने सक्रिय होणारे कार्बोहायड्रेटस् किमान 15 ग्रॅम या प्रमाणात खा किंवा प्या. तीन ते चार ग्लुकोज टॅब्लेटस्, ग्लुकोज जेलची एक ट्यूब, चार ते सहा गोड लिमलेटसारख्या गोळ्या (शुगर फ्री नाही), अर्धा कप फळांचा रस, अर्धा कप स्कीम दूध, एक चमचा मध (हा मध जिभेखाली ठेवा, इथे ठेवल्याने मध वेगाने रक्तप्रवाहात मिसळतो.) हायपोग्लायसेमियाची लक्षणे दिसत असतील, तर अशा स्थितीत वाहन चालवू नका. रक्तातील साखर कमी होणे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही; पण याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर ते धोकादायक ठरते.