

Body Detoxification Tips
कोल्हापूर : आज नोकरी करणारे, महिला वर्ग, विद्यार्थी यांची सकाळी उठल्यापासून धावपळ सुरु असते. कधी-कधी तर घरच्या कामात महिला इतक्या बिझी असतात की, सकाळची न्याहरी दुपारी ११-१२ वाजता खाल्ली जाते. तर नोकरी करणारे काहीही न खाता तसेच कामावर गेलेले दिसतात. यादरम्यान, हमखास पित्ताचा त्रास होतोच. शिवाय आपण अवेळी खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थितपणे होत नाही. सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे आणि काही जण दिवसभर नुसता चहावरचं जोर देतात. पण पोटात ॲसिड होऊन विविध आजार कधी जडतील, याचा थांगपत्ताही आपल्याला लागत नाही. तर आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी मुळात शरीर आतून स्वच्छ असले पाहिजे.
अनियमित दिनचर्या, नेहमीची धावपळ आणि फास्ट फूड, बाहेरील पदार्थ अधिक खाणे, झोप अपूर्ण असणे, जागरण, असंतुलित आहार अशा सर्व वाईट गोष्टींमुळे आपल्या शरीरात टॉक्झिन्स जमा होतात. परिणामी, यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. वाढलेलं वजन, बेढब शरीर, निरुत्साही आणि अशक्तपणा, डोळ्यांवर सातत्याने झोप, आळसपणा, मळमळ होणे, शरीर सुन्न पडणे अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. टॉक्झिन्सचे प्रमाण वाढले तर किडनी विकारांनाही सामोरे जावे लागते. पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या धावत्या जीवनशैलीतही तुम्हाला तुमचे आरोग्य जपता येतं. निरोगी शरीरासाठी आपले शरीर आतून स्वच्छ ठेवायला हवे. यासाठी सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास नंतर तो आयुष्यातील एक सवयीचा भाग होऊन जातो. म्हणून 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे..!'
सूर्योदयानंतर झोपून उठणे टाळले पाहिजे. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. यामुळे कामे लवकर आटोपता येईल आणि स्वत:साठी वेळ देता येईल. यासाठी रात्री लवकर झोपणे महत्त्वाचे आहे. कारण दिवसाची चांगली सुरुवात लवकर झोपण्यापासूनच सुरु होते. हे चक्र व्यवस्थित सुरु झाल्यास रात्री जागरण होणार नाही. आणि दिवसभर एनर्जेटिकही राहाल.
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी हितकारक ठरते. तुम्ही एक चमचा गायीच्या दुधाचे तूप त्यामध्ये मिक्स करू शकता. किंवा लिंबू पाणी देखील पिऊ शकता. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. यामुळे आतड्यांमध्ये चिटकून बसलेले टॉक्झिन्स मलविसर्जनाद्वारे बाहेर पडण्यास मदत होते.
सकाळी किमान २० मिनिटे योगासने आणि प्राणायाम करावे. यामध्ये भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम, भस्त्रिका प्राणायम, कपालभाती करावे. मलासनात बसावे. रात्री जेवल्यानंतर वज्रासनात बसावे.
दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी नाश्ता करणे गरजेचं आहे. पोहे, इडली, उपमा, शिरा, मोड आलेली कडधान्ये, सफरचंद, पपई, सी - व्हिडॅमिट युक्त फळे खाऊ शकता. शिवाय दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी पुरेसं पाणी गरजेचं आहे.
रात्री तुळशीची चार पाने एक ग्लास पाण्यामध्ये टाकून ठेवा. हे पाणी सकाळी प्या. ग्रीन टी, तुळस, आले चहादेखील घेऊ शकता. लिवरला हेल्दी ठेवण्यास मदत होईल. तुम्ही रात्री झोपताना हळद टाकून एक वाटी कोमट दूध देखील पिऊ शकता. हळद शरीराची सूज कमी करते.
संतुलित आहार घेणे फार महत्त्वाचे आहे. बाहेरचे खाणे टाळले पाहिजे. खूप मसालेदार, तळलेले, तुपातले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर. फ्रेंच फ्राईज, चायनीज फूड, व्हाईट ब्रेड, मैद्याचे पदार्थ संपूर्णपणे बंद केले पाहिजे. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, चिया सीड्स, फायबरयुक्त आहार पोट साफ होण्यासाठी उत्तम आहे.
चिंता,तणाव यामुळे शरीराला नुकसानच होते. दिवसभर चांगला विचार करा, चांगले राहा, चांगले बोला, सकारात्मक राहा. नकारात्मक गोष्टी डिलीट करा.
जंक फूड खाणे, अति गोड पदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, तासनतास एका जागी बसून राहणे यामुळे तुमचे वजन वाढते. निरोगी शरीर हवे असल्यास व्यायाम, हेल्दी फूड, दिनचर्या व्यवस्थित ठेवणं ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.