

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैली यांचे महत्त्व जगभरातील वैद्यक तज्ज्ञ सतत अधोरेखित करत आले आहेत. लहान बदलांमधून मोठा परिणाम साधता येतो, हे संशोधनातूनही स्पष्ट झाले आहे. काही विशिष्ट पेय पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि कर्करोग पेशींची वाढ थोपवली जाते.
ग्रीन टी : विशिष्ट पेय पदार्थांच्या सेवनाच्या यादीत सर्वप्रथम ग्रीन टीचा उल्लेख आहे. त्यातील ईजीसीजी कॅटेचिन्समुळे स्तन आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका 20 ते 30 टक्क्यांनी कमी होतो, असे संशोधन दर्शवते.
कॉफी : कॉफीमधील पॉलीफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंटसमुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. साधारणतः दर कपामागे जवळपास 15 टक्के संरक्षण लाभते, तसेच गर्भाशयाच्या आतल्या अस्तराच्या कर्करोगाविरुद्धही फायदेशीर परिणाम दिसतो.
साधे पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी पिल्यास शरीरातील हानिकारक द्रव्ये विरळ होतात, मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
डाळिंबाचा रस : डाळिंबाच्या रसामधील अॅलॅजिक अॅसिड आणि पॉलीफेनॉल्स कर्करोग पेशींची वाढ मंदावतात. विशेषतः प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांमध्ये डाळिंबाचा रस पीएसए पातळीचा वेगाने वाढणारा दर कमी करतो.
पाचवे पेय म्हणजे हळदयुक्त दूध, ज्याला ‘गोल्डन मिल्क’ असेही म्हटले जाते. हळदीतील कर्क्यूमिन दाह कमी करण्यासोबतच डीएनएचे नुकसान रोखते. नियमित सेवनामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स कमी होतात.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीसारख्या बेरीजमध्ये अँथोस्यानिन्स आणि तंतू मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अन्ननलिका व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
लिंबाचा रस : लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व फ्लॅव्होनॉईडसमुळे पोट व अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका 10 ते 15 टक्क्यांनी कमी होतो. मात्र आम्लपित्त किंवा अॅॅसिड रिफ्लक्स असलेल्या व्यक्तींनी तो काळजीपूर्वक घ्यावा. आठवे आणि शेवटचे म्हणजे विविध हर्बल टीकॅमोमाईल, आलं किंवा पुदिना. या सर्वांत पॉलीफेनॉल्स व दाहरोधक घटक असल्यामुळे पोट व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
या आठ पेय पदार्थांचा समावेश केवळ एक पूरक उपाय आहे. त्यासोबत नियमित व्यायाम, तंदुरुस्त वजन राखणे आणि तंबाखूचे सेवन टाळणे हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. आरोग्यदायी आहार, योग्य जीवनशैली आणि नैसर्गिक पेय पदार्थांचा समतोल वापर यामुळे दीर्घकाळासाठी कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो.