

डॉ. भारत लुणावत
भारत व आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळणार्या अश्वगंधामध्ये विशेषतः विथॅनोलाईडस्, सॅपोनिन्स व अल्कलॉइडस् या घटकांचा समावेश होतो. आयुर्वेदात अश्वगंधेचा वापर ताण कमी करण्यासाठी, झोप सुधारण्यासाठी व शरीराला सामर्थ्य देण्यासाठी केला जातो.
ताण व झोप यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा शरीर सतत तणावाखाली असते तेव्हा कॉर्टिसोल नावाचे हार्मोन अधिक प्रमाणात स्रवते. या वाढलेल्या हार्मोनमुळे मन अस्वस्थ होते, झोप येण्यास अडथळा निर्माण होतो किंवा वारंवार झोपमोड होते. त्यामुळे निद्रानाश, थकवा व बेचैनी वाढते. अशा परिस्थितीत अश्वगंधाचे सेवन अतिशय उपयुक्त ठरते. यातील गुणकारी घटक कॉर्टिसोलचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात आणि मनाला शांतता मिळवून देतात. परिणामी, झोप गाढ लागते व झोपेची गुणवत्ता सुधारते.
क्युरियस आणि इतर संशोधनात असे दिसून आले आहे की, अश्वगंधा शरीराला ताणाशी लढण्यासाठी सक्षम करते व मनात शांततेची भावना निर्माण करते. ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींनी अश्वगंधा सेवनानंतर झोपेची गुणवत्ता व दैनंदिन आरोग्य सुधारल्याचे सांगितले. त्यांच्यात निद्रानाशाचे प्रमाण कमी झाले व दिवसभराचा थकवा कमी जाणवला. आणखी एका अभ्यासात झोप येण्यास लागणारा वेळही कमी झाल्याचे दिसले. अश्वगंधाचे फायदे अनेक असले, तरी कोणत्याही स्थितीत तिचे सेवन करण्यापूर्वी वैद्यांचा, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण, निद्रानाशावरील गोळ्या किंवा थायरॉईडच्या औषधांसोबत तिचा परस्पर परिणाम होऊ शकतो.