

कोल्हापूर : कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रवाळाचा वापर करून संशोधकांना परिणामकारक औषधाची ब्लू प्रिंट विकसित करण्यात यश आले आहे. समुद्रातील सॉफ्ट कोरल (मृदू प्रवाळ) आणि त्यावरील सूक्ष्म जीवांपासून मिळणारी काही नैसर्गिक संयुगे कोरोना विषाणूला रोखण्यात अत्यंत प्रभावी ठरत आहेत.
अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर करून अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमिक्रॉन या सर्व घातक व्हेरियंटस्वर या संयुगांची चाचणी केली असता ती अत्यंत परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाजी विद्यापीठ, बेळगावचे केएलई कॉलेज ऑफ फार्मसी आणि झेक प्रजासत्ताकच्या पलॅकी विद्यापीठातील संशोधकांच्या एका संयुक्त पथकाने हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. समुद्रातील मृदू प्रवाळ (सॉफ्ट कोरल) आणि त्यावरील सूक्ष्म जीवांपासून मिळणारी काही नैसर्गिक संयुगे कोरोना विषाणूला रोखण्यात अत्यंत प्रभावी असल्याचे त्यांनी शोधून काढले आहे.
कोरोना विषाणू मानवी शरीरात प्रवेश करण्यासाठी आपल्या बाह्य आवरणावरील स्पाईक प्रोटीनचा वापर करतो; तर शरीरात शिरल्यानंतर स्वतःची संख्या वाढवण्यासाठी मेन प्रोटीज या एन्झाईमची मदत घेतो. सॉफ्ट कोरलमधील सूक्ष्म जीवांपासून मिळणारी कॉट्टोक्विनाझोलिन बी, टेट्राओर्सिनॉल ए आणि व्हर्सिकलरिटाईड यांसारखी नैसर्गिक संयुगे या दोन्ही प्रक्रियांना यशस्वीपणे रोखू शकतात.
रेमडेसिवीरसारख्या औषधांच्या तुलनेत ही नवीन सागरी संयुगे विषाणूशी अधिक घट्टपणे चिकटतात. त्यामुळे विषाणू निष्क्रिय होण्याची शक्यता वाढते. ही संयुगे नैसर्गिक असल्याने सुरक्षिततेच्या आंतरराष्ट्रीय निकषांवर पात्र ठरली आहेत. विशेषतः टेट्राओर्सिनॉल ए हे संयुग ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटस्वर अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
समुद्रातील जिवंत औषधशाळा
मृदू प्रवाळ (सॉफ्ट कोरल) हे समुद्राच्या तळाशी आढळणारे अत्यंत सुंदर, रंगीबेरंगी आणि लवचिक जलचर जीव आहेत. कडक कवचाच्या प्रवाळांप्रमाणे (हार्ड कोरल) यांच्या शरीराभोवती कॅल्शियमचे कठीण आवरण नसते. त्यामुळे ते समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर एखाद्या झाडासारखे किंवा पिसासारखे सहज डोलू शकतात. मृदू प्रवाळ ही समुद्राच्या तळाशी असणारी जिवंत औषधशाळाच आहे. स्वतःच्या बचावासाठी हे जीव शरीरातून विशिष्ट रासायनिक संयुगे सोडतात. संशोधकांनी नेमका याचाच फायदा घेत या रसायनांमधील विषाणूविरोधी गुणधर्म शोधून काढले आहेत. ही संयुगे नैसर्गिक असल्याने ती कृत्रिम रसायनांपेक्षा अधिक सुरक्षित मानली जातात.