Delhi man found with uterus : मुल होत नसल्याने वंध्यत्वाच्या तपासणीला गेला, स्कॅनिंगचे रिपोर्ट पाहताच 'तो' निघाला 'ती'!

२६ वर्षीय तरुणाच्या पोटात आढळले गर्भाशय, अतिशय दुर्मिळ केस पाहून डॉक्टरही चक्रावले
Delhi man found with uterus
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

Delhi man found with uterus : दिल्लीतील एका रुग्णालयात वंध्यत्वाच्या (इनफर्टिलिटी) तपासणीसाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाच्या शरीरात सुस्थितीत असलेले गर्भाशय (युटेरस) असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण सर्वसाधारण पुरुषासारखेच जीवन जगत होता आणि त्याच्यात पुरुषांची सर्व सामान्य शारीरिक लक्षणे होती. मात्र, वंध्यत्वाच्या तपासणीदरम्यान त्याच्या शरीराची अत्यंत दुर्मिळ रचना उघडकीस आली.

तरुण आला होता वंध्यत्वाच्या तपासणीला

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, राजौरी गार्डन येथील आरजी हॉस्पिटल्सचे मुख्य युरोलॉजिस्ट डॉ. सुशील खरबंदा यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. खरबंदा यांनी सांगितले की, "हा रुग्ण सुरुवातीला केवळ वंध्यत्वाच्या समस्येसाठी आला होता आणि त्याला या दुर्मिळ आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. तो वंध्यत्वाच्या उपचारासाठी आला होता. बाकी तो पूर्णपणे सक्रिय होता आणि त्याच्यामध्ये पुरुषांची सर्व लक्षणे होती."

Delhi man found with uterus
Xi Jinping India visit : शी जिनपिंग नवी दिल्लीत दाखल, सात वर्षांनंतर PM मोदींबरोबरील भेट का आहे महत्त्वपूर्ण?

तपासणीत आढळले नाहीत शुक्राणू

शारीरिक तपासणीदरम्यान डॉक्टरांना त्याच्या अंडकोषात (स्क्रोटम) दोन्ही वृषण (टेस्टीज) अनुपस्थित असल्याचे आढळले. तसेच त्याच्या वीर्य विश्लेषणात (सिमेन एनालिसिस) एकही शुक्राणू आढळला नाही, ज्याला वैद्यकीय भाषेत 'अझूस्पर्मिया' (Azoospermia) म्हटले जाते. "जेव्हा त्याची तपासणी करण्यात आली, तेव्हा दोन्ही वृषण गायब होते. त्याच्या वीर्य विश्लेषणाचा अहवाल शून्य, म्हणजेच अझूस्पर्मिया असा आला." या निष्कर्षांनंतर डॉक्टरांनी क्रोमोसोम टेस्ट, संप्रेरक (हार्मोनल) तपासण्या आणि इमेजिंग स्कॅन यांसारख्या अधिक सखोल तपासण्या केल्या.

Delhi man found with uterus
HEALTH ALERT : सावधान! झोपतानाचा मंद प्रकाशही हृदयासाठी ठरतो अपायकारक! नवीन संशोधनात काय आढळले?

स्कॅनमध्ये उघड झाले सुस्थितीतील गर्भाशय

क्रोमोसोमल तपासणीत रुग्णाचा 'XY' हा पुरुषाचा क्रोमोसोम पॅटर्न दिसून आला. मात्र, अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय (MRI) स्कॅनचे अहवाल धक्कादायक होते. त्याच्या शरीराच्या आत एक सुस्थितीत असलेले गर्भाशय असल्याचे स्पष्ट झाले. "तो क्रोमोसोमच्या दृष्टीने सामान्य 'XY' पुरुष होता. परंतु पुढील तपासणीत अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय अहवाल आमच्यासाठी धक्कादायक होते. त्याच्या पोटात एक सुस्थितीतील गर्भाशय होते," असे डॉ. खरबंदा यांनी सांगितले.

ही अतिशय दुर्मिळ स्थिती

यानंतर या दुर्मिळ स्थितीचे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांनी अतिरिक्त अनुवंशिक (जेनेटिक) आणि संप्रेरक तपासण्या केल्या. 'आयएएसएच इन्स्टिट्यूट ऑफ अँड्रॉलॉजी अँड सेक्स्युअल हेल्थ'चे संस्थापक आणि अँड्रॉलॉजिस्ट डॉ. चिराग भंडारी यांच्या मते, ही स्थिती 'पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम' (PMDS) या दुर्मिळ आजारामुळे उद्भवू शकते. "याला पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम म्हणतात. याचा अर्थ पुरुषाच्या शरीरात बाहेरून सामान्य जननेंद्रिये (वृषण आणि लिंग) असूनही आत गर्भाशय अस्तित्वात असते. ही अतिशय दुर्मिळ स्थिती आहे," असे डॉ. भंडारी यांनी स्पष्ट केले.

Delhi man found with uterus
Men's Health News : पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयविकार आणि डायबिटीजचे संकेत - रिसर्च

काय आहे 'पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम'?

PMDS हा लैंगिक विकासातील एक दुर्मिळ विकार आहे. यात 'XY' क्रोमोसोम आणि पुरुषाची बाह्य जननेंद्रिये असलेल्या व्यक्तीच्या शरीरात गर्भाशय आणि काही वेळा फॅलोपियन ट्यूब्ससारख्या 'मुलेरियन रचना' तशाच राहतात. सामान्य पुरुषाच्या विकासादरम्यान वृषणाद्वारे तयार होणाऱ्या 'अँटी-मुलेरियन संप्रेरकामुळे' (AMH) मुलेरियन डक्ट्स नष्ट होतात. जर AMH पुरेशा प्रमाणात तयार झाले नाही किंवा शरीराने त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही, तर या रचना शरीरात तशाच राहू शकतात. "वृषणातून स्रवणाऱ्या 'AMH' संप्रेरकामुळे सामान्य पुरुष गर्भातील मुलेरियन डक्ट्स नष्ट होतात. परंतु ज्या प्रकरणांमध्ये AMH पुरेशा प्रमाणात तयार होत नाही किंवा शरीराकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही, तिथे या नलिका तशाच राहतात," असे ते म्हणाले.

या स्थितीमुळे वंध्यत्व का येते?

अंडकोषात वृषण नसण्याचा प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी वृषणाचे तापमान शरीराच्या मूळ तापमानापेक्षा कमी असणे आवश्यक असते. जेव्हा वृषण पोटाच्या आत राहतात, तेव्हा शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होतो. वंध्यत्व हे केवळ शुक्राणूंच्या संख्येवर अवलंबून नसते, तर ते शारीरिक रचना, संप्रेरके, अनुवंशिकता किंवा विकासात्मक समस्यांमुळेही होऊ शकते, असेही डॉ. भंडारी यांनी स्पष्ट केले.

गर्भाशय आणि वृषण का काढून टाकण्यात आले?

डॉ. खरबंदा यांनी सांगितले की, वैद्यकीय पथकाने लॅपरोस्कोपिक पद्धतीचा (किमान शस्त्रक्रिया तंत्र) वापर करून गर्भाशय आणि दोन्ही वृषण काढून टाकण्याचा निर्णय घेतला. "मी रुग्णाला समजावून सांगितले की ते काढण्याचे मुख्य कारण म्हणजे भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका असतो," असे त्यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर हे ऊतक (टिश्यू) बायोप्सीसाठी पाठवण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत कर्करोगाची (Malignancy) अगदी अल्प लक्षणे दिसून आली.

निदानाविना राहू शकणारा दुर्मिळ आजार

डॉ. भंडारी यांच्या मते, PMDS ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असून वैद्यकीय साहित्यात याच्या केवळ काही प्रकरणांची नोंद झाली आहे. पुरुष म्हणून वाढलेल्या आणि ओळख असलेल्या व्यक्तीमध्ये गर्भाशय आढळणे ही केवळ एक विचित्र वैद्यकीय घटना म्हणून पाहिली जाऊ नये, तर तज्ज्ञांकडून सखोल तपासणी होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news