

सध्याच्या आरोग्य सजगतेच्या युगात अनेकजण पारंपरिक उपायांकडे वळताना दिसतात. यातील एक प्रमुख ट्रेंड म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे. मात्र, योग्य पद्धतीने याचा वापर न झाल्यास हे आरोग्यास धोकादायक ठरू शकते.
पारंपरिक आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी शरीरासाठी गुणकारी मानले जाते. याला ‘ताम्र जल’ म्हटले जाते. हे पाणी वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना संतुलित करत असल्याचे सांगितले जाते. परंतु काही वैज्ञानिक अभ्यासांनुसार जर योग्य प्रमाण आणि काळजी घेतली नाही, तर यामुळे शरीरात कॉपर टॉक्सिसिटी देखील होऊ शकते.
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी 6 ते 8 तासांनंतर त्यात सूक्ष्म प्रमाणात तांब्याचे अणु मिसळतात. यालाच ओलिगोडायनामिक इफेक्ट म्हणतात. हे प्रभावीपणे पाण्यातील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करतात, परंतु रोज या पद्धतीने पाणी घेतल्यास शरीरात जास्त प्रमाणात तांब साठण्याचा धोका असतो.
काही लोक दिवसातून अनेकदा तांब्याच्या बाटलीतले पाणी पितात, जे चुकीचे आहे.
काहीजण त्यात लिंबूपाणी किंवा इतर आम्लयुक्त पेये ठेवतात, जे तांब्याच्या भांड्यात ठेवणे अत्यंत धोकादायक ठरते.
नियमित स्वच्छता न केल्यास भांड्याच्या आत गंज साचतो, ज्यामुळे पाणी दूषित होऊ शकते.
प्रौढ व्यक्तीसाठी दररोज केवळ 0.9 मि.ग्रा. तांबा आवश्यक असतो, जो बहुतेक वेळा अन्नातून मिळतो. त्यामुळे तांब्याचे पाणी दिवसातून एकदाच, तेही सकाळी उपाशीपोटी घेतल्यास पुरेसे ठरते.
तांब्याच्या भांड्यात फक्त स्वच्छ पाणीच ठेवा.
कधीही लिंबू, व्हिनेगर किंवा इतर आम्लीय पदार्थ ठेवू नका.
भांडे नियमितपणे नींबू, मीठ किंवा टमाट्याच्या रसाने स्वच्छ करा.
गर्भवती महिला, लहान मूलं किंवा लीव्हरच्या समस्यांनी ग्रस्त व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तांब्याचे पाणी पिऊ नये.
तांब्याच्या भांड्यातले पाणी हे फायदेशीर असले तरी योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि योग्य काळजी घेतल्यासच ते आरोग्यास उपयुक्त ठरते. अन्यथा, अति उपयोग आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतो.