

जगभरातील महिलांमध्ये वाढत्या प्रमाणावर आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) एक प्रमुख समस्या ठरत आहे. या आजारात सुरुवातीला स्तनात ट्युमर तयार होतो, जो योग्य वेळी निदान आणि उपचार न झाल्यास शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. मात्र, लवकर लक्षात आल्यास ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वी उपचार होऊ शकतात. काही शारीरिक लक्षणे आणि जीवनशैलीशी संबंधित घटक या आजाराच्या जोखमीला वाढवतात. जाणून घेऊया त्यातील महत्त्वाचे संकेत आणि कारणे.
बीआरसीए-1 आणि बीआरसीए-2 या दोन जनुकांमध्ये होणारे म्युटेशन (जनुकीय बदल) ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवतात. सामान्यतः ही जनुके शरीरात कर्करोगाला प्रतिबंध करतात, पण म्युटेट झाल्यास कॅन्सर होण्याचा धोका ६९ ते ७२ टक्क्यांपर्यंत वाढतो. हे जनुक बदल कुटुंबातून पिढ्यानपिढ्या संक्रमित होतात. त्यामुळे जर कुटुंबात पूर्वी कोणाला ब्रेस्ट किंवा ओव्हरी कॅन्सर झाला असेल, तर त्या स्त्रीने वेळोवेळी जेनेटिक टेस्ट करून घ्यावी.
अधिक वजन, स्थूलपणा आणि व्यायामाचा अभाव हे ब्रेस्ट कॅन्सरच्या जोखमीचे प्रमुख घटक आहेत. चरबीच्या पेशींमुळे शरीरात एस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण वाढते, जे कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. याशिवाय धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन यामुळेही स्तनाच्या पेशींमध्ये नुकसान होऊन कॅन्सरचा धोका वाढतो.
मासिक पाळी लवकर सुरू होणे, उशिरा मेनोपॉज होणे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा दीर्घ वापर आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकाळ उपयोग या सर्व गोष्टी ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवतात. याउलट लवकर गर्भधारणा होणे आणि ब्रेस्टफीडिंग करणे या गोष्टी काही प्रमाणात कॅन्सरपासून संरक्षण देतात.
नुकत्याच एका अभ्यासात आढळले की मधुमेह आणि इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या महिलांमध्ये विशेषतः मेनोपॉजनंतर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. खराब मेटाबॉलिझम आणि वजनवाढ यामुळे हार्मोनल असंतुलन होऊन कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. रेडिएशन, विशेषतः चेस्ट रेडिओथेरपी आणि काही प्लास्टिक वा कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये असलेले केमिकल्स शरीरातील हार्मोन बिघडवतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे जाणवल्यास किंवा जोखीम असलेल्या गटात आपण मोडत असाल, तर नियमित तपासणी आणि वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कॅन्सर पूर्णतः बरा होऊ शकतो.