

मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची आणि पूर्णतः नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी या प्रक्रियेबाबत चुकीचे समज, अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात खोलवर रुजलेले आहेत. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मासिक पाळीच्या गैरसमजाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत
मासिक पाळी उशिराने येणे किंवा थांबणे म्हणजे स्त्री गरोदर आहे, हा समज चुकीचा आहे. यामागे PCOS, हार्मोनल असंतुलन, वाढलेले वजन, मानसिक ताण, खराब आहार किंवा जीवनशैलीतील बदल कारणीभूत असू शकतात. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पाळीच्या काळात व्यायाम करू नये, असे अनेकांना वाटते. परंतु डॉक्टर सांगतात की चालणे, हलकी स्ट्रेचिंग किंवा सौम्य योगासने केल्याने वेदना कमी होतात, मन शांत राहतं. व्यायामात अतीरेक टाळावा आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करावा.
मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. केस धुणे, आंघोळ करणे हे सर्व नैसर्गिकरीत्या करता येते. विशेषतः गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला आराम मिळतो. या काळात महिला अशुद्ध होतात, हा समज वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे.
मासिक पाळी ही एक जैविक प्रक्रिया आहे. गर्भाशयातील अस्तर शरीराबाहेर टाकण्याची ही नैसर्गिक रीत आहे. त्यामुळे स्त्री अपवित्र ठरत नाही. मासिक पाळी ही लाज किंवा संकोचाची गोष्ट नसून ती आरोग्यदायी प्रजनन प्रक्रियेचं लक्षण आहे.
पाळीच्या वेळी काही आंबट किंवा लोणचंयुक्त पदार्थ खाल्ल्यास अपाय होतो, असा समज आहे. मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. दही, चिंच, लोणचं हे पदार्थ शरीराला पोषणदायी ऊर्जा देतात.
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना स्वयंपाकघरात जाण्यास मज्जाव केला जातो. यामागचा समज असा की, पाळीतील स्त्रीच्या स्पर्शाने अन्न खराब होते. पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे. पाळीचा अन्नाच्या गुणवत्तेशी काहीही संबंध नाही. “स्त्रियांनी पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत अधिक जागरूक व्हावे आणि समाजात असलेले जुने गैरसमज दूर करावेत. मासिक पाळी लपविण्याची गोष्ट नाही तर समजून घेण्याची गरज आहे.”