

Precocious Puberty blood test
मुंबई: लहान वयातील मुलींमध्ये दिसून येणाऱ्या अवेळी यौवनावस्थेच्या दोन वेगवेगळ्या स्थितींमध्ये अचूक फरक ओळखण्यासाठी रक्तातील दोन हार्मोन्सचे गुणोत्तर उपयुक्त ठरू शकते, असा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला आहे. या शोधामुळे सध्याची गुंतागुंतीची आणि वेळखाऊ तपासणी प्रक्रिया अधिक सोपी होण्याची शक्यता आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थेच्या (आयसीएमआर-एनआयआरआरएच) आणि बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. 'किसपेप्टिन-१०' आणि 'ल्युटनायझिंग हार्मोन' यांच्या गुणोत्तराचे हे संशोधन 'क्लिनिका किमिका आक्टा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
मुलींमध्ये आठ वर्षांच्या वयापूर्वी स्तनाचा विकास होणे, हे 'सेंट्रल प्रिकॉशियस प्युबर्टी' (central precocious puberty) किंवा 'प्रिमॅच्युअर थेलार्के' (premature thelarche) यांपैकी एका स्थितीचे लक्षण असू शकते. पहिल्या स्थितीत शरीरात यौवनावस्थेची प्रक्रिया वेळेपूर्वीच सुरू होते आणि त्यासाठी उपचारांची गरज भासू शकते. दुसऱ्या स्थितीत केवळ स्तनांची वाढ दिसून येते; मात्र यौवनावस्थेची इतर लक्षणे आढळत नाहीत. ही स्थिती साधारणतः अपायकारक नसून केवळ नियमित देखरेखीची आवश्यकता असते. सध्या, या दोन स्थितींमधील फरक ओळखण्यासाठी 'जीएनआरएच' (GnRH - Gonadotropin-Releasing Hormone) स्टिम्युलेशन टेस्ट केली जाते. यामध्ये शरीरात संप्रेरक दिल्यानंतर काही तासांच्या कालावधीत अनेकदा रक्त नमुने घ्यावे लागतात. शिवाय, ही चाचणी सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध नसते.
संशोधकांना असे आढळले की, 'किसपेप्टिन-१०' किंवा 'एलएच' (LH) यांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास, या दोन स्थितींमधील फरक अचूकपणे ओळखता येत नाही. मात्र, या दोन्ही संप्रेरकांच्या गुणोत्तराचा वापर केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. संशोधकांच्या मते, हा निर्देशांक सध्याच्या निदान चाचण्यांसोबत एक उपयुक्त साधन ठरू शकतो. या गुणोत्तराची संभाव्य उपयुक्तता या अभ्यासातून समोर आली असल्याचे डॉ. अंतरा बॅनर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, या अभ्यासाच्या मुख्य लेखिका, डॉ. सुचित्रा सुर्वे यांनी सांगितले की, रक्त नमुन्यावरून काढलेला हा निर्देशांक या दोन स्थितींमधील फरक ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत ठरू शकतो. ज्या मुलींना प्रत्यक्षात उपचारांची गरज आहे, त्यांची वेळेवर ओळख पटण्यास यामुळे मदत होईल आणि इतर मुलींना अनावश्यक तपासण्यांचा त्रास टळू शकेल, असा विश्वास वाडिया रुग्णालयाच्या बालरोग एंडोक्रिनोलॉजी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुधा राव यांनी व्यक्त केला.
तथापि, हे प्राथमिक स्वरूपाचे संशोधन असून याला सध्या अस्तित्वात असलेल्या 'जीएनआरएच' (GnRH) चाचणीचा पर्याय मानले जाऊ शकत नाही; याचा नियमित वापर करण्यापूर्वी, अधिक मोठ्या रुग्णसमूहांवर स्वतंत्रपणे याची पडताळणी होणे आवश्यक आहे.