
दिवसभर एकाच जागी बसून काम करणे किंवा बराच वेळ उभे राहणे यामुळे अनेकदा हात-पाय जड होणे, स्नायूंमध्ये आखडण येणे आणि थकवा जाणवू लागतो. यामागे रक्ताभिसरणाचा वेग कमी होणे हे एक कारण असू शकते. शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम रक्त करते. त्यामुळे हात-पायांचे आरोग्य आणि स्नायूंची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत असणे आवश्यक आहे. नियमित शारीरिक हालचाल, दीर्घकाळ एकाच जागी बसणे टाळणे आणि निरोगी जीवनशैली यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. यासाठी काही योगासनांचाही उपयोग होऊ शकतो.
या आसनात दोन्ही हात आणि पाय जमिनीवर टेकवून नितंबांचा भाग वर उचलला जातो. त्यामुळे शरीराचा आकार उलट्या 'V' अक्षरासारखा दिसतो. या आसनामुळे पोटऱ्या, मांडीचे मागील स्नायू, खांदे, मनगट आणि हातांना चांगला ताण मिळतो. शरीरातील विविध स्नायू सक्रिय झाल्यामुळे हात-पायांच्या हालचालींना चालना मिळते. बराच वेळ बसल्यामुळे आलेला आखडलेपणाही कमी होण्यास मदत होऊ शकते. हे आसन करताना काही वेळ सामान्य श्वास घ्यावा. सुरुवातीला पाय पूर्ण सरळ करण्याऐवजी गुडघे थोडे वाकवून हे आसन करावे. मनगटांवर जास्त ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी.
या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पाय भिंतीला टेकवून सरळ वरच्या दिशेने ठेवले जातात. यामुळे पाय हृदयाच्या पातळीपेक्षा उंच राहतात. गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पायांमधून रक्त हृदयाकडे परत जाण्याच्या प्रक्रियेला मदत होऊ शकते. दिवसभर उभे राहिल्यानंतर किंवा चालल्यानंतर पायांमध्ये जाणवणारा जडपणा कमी करण्यासाठी हे आसन आरामदायी ठरू शकते. काही मिनिटे या स्थितीत राहून हळूहळू आणि शांतपणे श्वास घ्यावा.
३. ताडासन
ताडासन हे उभे राहून केले जाणारे सोपे योगासन आहे. शरीराचा तोल, योग्य स्थिती आणि संतुलन राखण्यावर या आसनात भर दिला जातो. हे आसन करताना दोन्ही पाय जमिनीवर घट्ट ठेवून शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान प्रमाणात विभागावे. यामुळे पायांचे तळवे, पोटऱ्या आणि मांडीचे स्नायू सक्रिय होतात. या आसनासोबत टाच हळूहळू वर उचलून पुन्हा खाली ठेवण्याची हालचाल केल्यास पायांना अधिक चांगला व्यायाम मिळू शकतो.
४. त्रिकोणासन
त्रिकोणासन करताना दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभे राहावे. त्यानंतर एका हाताने पायाच्या दिशेने खाली झुकावे आणि दुसरा हात वरच्या दिशेने सरळ ठेवावा. या आसनामुळे पाय, नितंब आणि शरीराच्या बाजूच्या स्नायूंना ताण मिळतो. तसेच घोटे आणि गुडघ्यांच्या आसपासच्या भागांनाही हालचाल मिळते. हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळावा आणि श्वास नियमित ठेवावा. कोणतीही हालचाल घाईने करू नये.
५. सेतू बंधासन
या आसनासाठी पाठीवर झोपून दोन्ही गुडघे वाकवावेत आणि पाय जमिनीवर घट्ट टेकवावेत. त्यानंतर खांदे आणि पाय जमिनीवर ठेवून हळूहळू नितंबांचा भाग वर उचलावा. या हालचालीमुळे मांडी, नितंब आणि पोटऱ्यांचे स्नायू सक्रिय होतात. काही क्षण या स्थितीत राहून श्वास घ्यावा आणि नंतर हळूहळू नितंब खाली आणावेत. हे आसन काही वेळा पुन्हा करता येते.
६. पवनमुक्तासन
पवनमुक्तासन करण्यासाठी पाठीवर झोपून एक किंवा दोन्ही गुडघे हळूहळू छातीकडे आणावेत. या आसनामुळे नितंब, गुडघे आणि पाठीच्या खालच्या भागाला हालचाल मिळते. तसेच शरीराच्या खालच्या भागातील आखडलेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. सुरुवातीला दोन्ही पाय एकाच वेळी छातीकडे आणण्याऐवजी एकावेळी एक पाय घेऊन हे आसन करणे अधिक सोयीचे ठरते. गुडघे छातीकडे आणताना त्यांना जोराने ओढू नये.
७. अनुलोम-विलोम
अनुलोम-विलोम हा श्वसनाचा एक प्रकार आहे. हे प्राणायाम करताना एका नाकपुडीतून श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीतून सोडला जातो. या श्वसनप्रकारासोबत हात आणि पायांची हलकी हालचाल केल्यास त्यांच्यातील सांधे सक्रिय ठेवण्यास मदत होऊ शकते. श्वसनाचा सराव करताना हातांची बोटे हळूहळू उघडावीत आणि मिटावीत. तसेच मनगट, घोटे आणि पायांची बोटे हलवावीत. यामुळे हात-पायांमधील आखडलेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. श्वास रोखून धरू नये किंवा शरीरावर अनावश्यक ताण देऊ नये.