Knee Surgery | गुडघेदुखीवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी...

Knee Surgery |
Knee Surgery | गुडघेदुखीवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी...
Published on
Updated on

डॉ. सुहास शहा

अनेकदा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला की रुग्ण वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहतात. वेदना तीव्र असल्यास किंवा हाडामध्ये गंभीर बिघाड असल्यास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. मात्र, आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की, नैसर्गिक सांधा न काढता गुडघा पूर्ववत करणे शक्य झाले आहे.

गुडघा ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि तितकीच वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. गुडघ्यातील अस्थिबंध म्हणजेच लिगामेंट हे मांडीचे आणि पोटरीचे हाड एकमेकांशी जोडून ठेवतात. या रचनेत अँटिरियर क्रूसिएट लिगामेंट (एसीएल), पोस्टरियर क्रूसिएट लिगामेंट (पीसीएल), मेडियल कोलॅटरल लिगामेंट (एमसीएल) आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंट (एलसीएल) या चार प्रमुख अस्थिबंधांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यातील एसीएल नावाचा अस्थिबंध नडगीच्या हाडाला मांडीच्या हाडाच्या पुढे जाण्यापासून रोखून गुडघ्याला स्थिरता देतो. खेळाडूंमध्ये किंवा अपघातांमध्ये जेव्हा या अस्थिबंधांना इजा होते, तेव्हा गुडघ्याचे कार्य विस्कळीत होते आणि वेदनांचा प्रवास सुरू होतो.

अनेकदा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला की रुग्ण वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहतात. वेदना तीव्र असल्यास किंवा हाडामध्ये गंभीर बिघाड असल्यास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात नी-रिप्लेसमेंट म्हणजेच गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया सर्रास केली जाते. मात्र, अशा शस्त्रक्रियेमध्ये नैसर्गिक सांधा काढून त्या जागी कृत्रिम सांधा बसवला जातो. मात्र, आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की, नैसर्गिक सांधा न काढता गुडघा पूर्ववत करणे शक्य झाले आहे. यासाठी १९५० च्या दशकात रशियन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गॅब्रिएल इलिझारोव्ह यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आजही वरदान ठरत आहे.

या तंत्रज्ञानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात बाह्य फिसिएटरचा वापर केला जातो. साध्या भाषेत सांगायचे तर, हाडाच्या बाह्य बाजूला एक धातूची फ्रेम लावली जाते आणि तिला नियंत्रित तणावाखाली ठेवले जाते. जेव्हा सांध्यांमध्ये किंवा हाडांमध्ये इन्फेक्शन असते, हाड मोडलेले असते किंवा चुकीच्या पद्धतीने जोडले गेलेले असते, तेव्हा हे तंत्रज्ञान जादूची कांडी असल्यासारखे काम करते. अनेकांना असा गैरसमज असतो की, गुडघ्यातील कार्टिलेज एकदा खराब झाले की ते पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाही; परंतु रशियन तंत्रज्ञानामुळे गुडघ्यांची हालचाल पूर्ववत करणे शक्य होते, ज्यामुळे रुग्ण पुन्हा मांडी घालून बसू शकतात किंवा भारतीय पद्धतीने खाली बसू शकतात.

या उपचारपद्धतीमध्ये गुडघा वाकडा असल्यास तो फिक्सेटरच्या सहाय्याने सरळ केला जातो. सर्वांत मोठी उपलब्धी म्हणजे ज्या रुग्णांना वाकड्या गुडघ्यांमुळे केवळ एका पायावर भार देऊन चालावे लागते, त्यांना अवघ्या तीन ते चार दिवसांच्या उपचारानंतर दोन्ही पायांवर चालणे शक्य होते. केवळ गुडघेदुखीच नव्हे, तर हाडांची उंची वाढवण्यासाठी किंवा पोलिओ, सेरेब्रल पाल्सीमुळे झालेल्या शारीरिक दोषांवर मात करण्यासाठी हे तंत्रज्ञान आजही जगात श्रेष्ठ मानले जाते. एलिझारोव्हचे वैशिष्ट्य म्हणजे डायबिटीक फूटमध्ये रक्ताभिसरण मंदावल्यामुळे जखम भरत नाही, पण हे तंत्रज्ञान कृत्रिमरीत्या त्या भागात रक्ताचा नवीन महामार्ग तयार करते. एकदा का पायाला रक्तपुरवठा पूर्ववत झाला की, शरीराची नैसर्गिक शक्ती ती जखम स्वतःहून भरून काढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news