

डॉ. स्नेहल माळी
स्तनपानाचे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यविषयक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, बदलत्या जीवनशैलीमध्ये स्तनपानाविषयक गैरसमज दूर करण्यासाठी १९९२ मध्ये जगात प्रथमच जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. १ ऑगस्ट ७ ऑगस्ट दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येतो.
आईचे दूध हा बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्कृष्ट परिपूर्ण व संतुलित आहार आहे. त्यात बाळाच्या पोषणासाठी सर्व आवश्यक पोषण तत्त्वे तर असतातच शिवाय बाळाचे आजारांपासून संरक्षण करणारी प्रतिजीवे असतात. जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांसाठी बाळाला आईच्या दुधाचीच गरज असते. अनेक माता सहा महिन्यांनंतरही बाळाला अंगावर पाजतात, पण सहाव्या महिन्यांनंतर बालकाला इतर पूरक आहाराची गरज असते.
स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होऊन त्यांचे नाते द़ृढ होते. आईचे दूध कोणत्याही वेळी उपलब्ध होऊ शकते. यामध्ये कोणत्याही भेसळीचा किंवा रोग संक्रमणाचा धोका नसतो. कोलोस्ट्रम म्हणजे सुरुवातीचे पिवळे चिकट दूध बाळाची रोगप्रतिकारक्षमता वाढवते. आतड्याची संक्रमणे (अतिसार जुलाब) विरोधी शक्ती वाढवते. स्तनपान घेणार्या बालकांच्या मेंदूचा सर्वांगीण विकास होऊन कार्यक्षमता वाढते. आईच्या दुधामुळे कानाचा संसर्ग, अॅलर्जी आणि अतिसाराचा धोका कमी होतो. त्यात अ, ड, ई, व के ही आवश्यक जीवनसत्त्वे असतात. आईने बाळाला कोलोस्ट्रम पाजलेच पाहिजे. कारण ते अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असते. त्याऐवजी बाळाला साखरेचे पाणी, मध, लोणी, इतर काहीच देऊ नये.
स्तनाचा कर्करोग, अस्थिसुषिरता व स्तनामध्ये गाठी होण्याचा धोका कमी होतो. डिलीव्हरीनंतरचा रक्तस्राव कमी होण्यास मदत होते. गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. स्तनपानासाठी अधिक उष्मांक वापरल्याने गर्भावस्थेत आईचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. मातेला मानसिक शारीरिक समाधान व आनंद मिळवून देते.
बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने त्याला स्तनपान देणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय कारणांसाठी जन्मानंतर बाळ आईपासून दूर असेल, अतिदक्षता विभागात असेल आणि आई स्तनपान करूच शकत नसेल तरी ह्यूमन मिल्क बँकेतील दुधाचा वापर बाळासाठी केला जातो. आईला स्तनपान देण्यास कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यास प्रभावी समुपदेशन उपयुक्त ठरते. स्तनदा मातांचे दूध ह्यूमन मिल्क बँकेत साठवून ते गरजू नवजात बाळासाठी देण्याचे पर्यायही आता उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्तनपानाला पर्याय असू शकत नाही.
सुरुवातीच्या काळात बाळाला आईशी जुळवून घेण्यासाठी व यथार्थ स्तपनानासाठी काही दिवस लागू शकतात, हे पूर्णपणे नॉर्मल आहे, अशा काही अडचणी निर्माण झाल्यास मातेने थोडासा धीर धरावा, घाबरून जाऊ नये.
बहुतेक सर्व बाळांचे वजन सुरुवातीच्या काही दिवसात कमी होते. मात्र ते 1-2 आठवड्यात भरून निघते. बाळाला योग्य स्तनपान मिळाल्यास बाळाचे वजन वाढते. आठवड्यानंतर बाळाचे वजन दिवसा 20 ते 30 ग्रॅमने वाढते असल्यास, बाळ 24 तासांत 4-6 वेळा डायपर ओले करत असते तर आईचे दूध बाळाला पुरेसे आहे असे समजावे.
आज काल अनेक महिला नोकरी करतात. अशा मातांना बाळाला घरी ठेवून अनेक तास बाहेर राहावे लागते. अशा परिस्थितीत बाळाची हेळसांड होऊ नये, तसेच मातेला आरोग्यविषयक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी त्यांनी पुढील फिडींगसाठी दूध काढून साठवून ठेवण्याची सवय लावल्यास ते माता आणि बाळ या दोघांसाठीही फायदेशीर असते. बाळाला फक्त अंगावरील दूधच द्यायचे असल्यास हा चांगला पर्याय आहे. दूध काढून ठेवल्यास दूध सुटण्यास मदत होते व बाळाचे पोषण चांगले होते.
दूध साठवताना पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात : आईचे दूध बे 4 ते 6 तास रूम टेम्परेचरला चांगले टिकते. उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेल्या झाकण असलेल्या काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात साठवावे. तत्काळ फ्रीजमध्ये ठेवून हे दूध 24 ते 48 तासांच्या आतच वापरावे. फ्रीजमधील दूध बाळाला देताना ते भांडे किंवा बाटली गरम पाण्याच्या बाऊलमध्ये ठेवून सामान्य तापमानावर आणावे कधीही ते मायक्रोवेव्हवर गरम करू नये, तसेच कोमट दूध परत फ्रिजमध्ये ठेवू नये.
स्तनपानाला प्रोत्साहन व समर्थन देण्यासाठी मातेला आवश्यक तेहा प्रत्यक्ष सल्ला देऊन व तिला तिच्या नातेवाईकांनी पाठिंबा दिल्यास स्तनपानाच्या नैसर्गिक इच्छेला प्रोत्साहन मिळते. प्रसूतीपूर्वीपासूनच बाळाला अंगावर पाजण्यासाठीच्या बाबींचा अभ्यास असावा. मला माझ्या बाळाला स्तनपान करायचे आहे हा सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवावा. प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर बाळाला अंगावर पाजावे तसेच आई व बाळाने शक्य तितके जवळ रहावे (रुमिंग इन). रोज स्नानाच्यावेळी स्तन स्वच्छ धुवावेत व हलकासा मसाज करावा व ते नैसर्गिकरीत्या वाळू द्यावेत. आपले व बाळाचे अंग व कपडे नेहमी सच्छ व व्यवस्थित ठेवावेत.
हेही वाचा :