

पाणी पिण्याच्या बाबतीतही आयुर्वेद विशिष्ट मार्गदर्शन देते. जेवताना छोटे-छोटे घोट घेतलेले पाणी हितावह असते, पण जेवण पूर्ण होताच लगेच पाणी प्यायल्यास पचन प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे दुपारचे असो वा रात्रीचे, जेवणानंतर किमान 40 ते 45 मिनिटांनीच पाणी पिणे योग्य मानले गेले आहे.
डॉ. भारत लुणावत
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणसं अनेकदा आपल्या आहारशैलीकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि त्या पुढे जाऊन गंभीर आजारांचे रूप घेतात. याच पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने अलीकडेच आयुर्वेदावर आधारित काही महत्त्वपूर्ण गोल्डन रूल्स सांगितले आहेत. या छोट्या-छोट्या जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने केवळ पचनक्रिया सुधारता येते असे नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यदेखील अधिक चांगले ठेवता येते.
आयुर्वेदानुसार, केवळ आपण काय खातो हे महत्त्वाचे नसून आपण ते कसे आणि केव्हा खातो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेवताना शांत आणि सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. क्रोध, भीती किंवा तणाव यांसारख्या नकारात्मक भावना पचनक्रियेवर विपरीत परिणाम घडवतात.
भोजन हळूहळू आणि व्यवस्थित चावून खाल्ल्यास त्याचा स्वाद तर वाढतोच, पण त्याचबरोबर पचनासाठीचे एन्झाईम्स सक्रिय होतात. त्यामुळे अन्न नीट पचते आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्या टाळता येतात.
आयुर्वेदानुसार अन्न ताजे आणि ऋतुनुसार असावे. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार अन्नपदार्थांची निवड करणे आवश्यक आहे.
रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करणे सर्वात चांगले मानले जाते, जेणेकरून झोपण्यापूर्वी शरीराला पचनासाठी पुरेसा वेळ मिळतो.
जड आणि तुपकट जेवण पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण आणते. यामुळे गॅस, आम्लपित्त आणि इतर समस्या वाढतात. त्यामुळे दुपारी दिवसाचे मुख्य जेवण घेणे आणि रात्री हलके व सहज पचणारे आहार घेणे हेच अधिक योग्य आहे.
आयुष मंत्रालयाने सुचवलेले हे आयुर्वेद-आधारित सोपे नियम आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अंगीकारल्यास केवळ पचन सुधारेल असे नाही, तर मनःशांती, सुद़ृढ शरीर आणि निरोगी जीवन यासाठीही त्यांचा दीर्घकालीन लाभ होऊ शकतो.