Ayurvedic remedies for Acidity:
आवळा हे आपल्या देशातील एक श्रेष्ठ फळ आहे. हिरवे आवळे पौष, माघ महिन्यात बाजारात येतात. आवळ्याच्या पांढरा आवळा व रानआवळा अशा दोन जाती आहेत. कृत्रिम जीवनसत्त्वांच्या गोळ्यांपेक्षा 'क' जीवनसत्वाने समृद्ध असणारा आवळा खाणे अधिक हितकारक असते. बिया काढून सुकविलेल्या आवळ्याच्या फोडींना 'आवळकाठी' असे म्हणतात. तसेच पित्तशामक म्हणून आवळ्याचा मुरंबा प्रसिद्ध आहे.
'नैसर्गिक औषधे आणि घरगुती उपाय' या पुस्तकात विजय रणदिवे यांनी पित्ताच्या समस्यांवर उपाय सांगितले आहेत. "चांगले पिकलेले, मोठे, डाग नसलेले १ किलो आवळे घ्यावेत. ते ओल्या फडक्याने स्वच्छ करून टोचून घ्यावेत. (आवळे टोचण्यासाठी स्टीलची टोचणी घ्यावी. लोखंडी टोचणी वापरू नये, कारण लोखंडाचा स्पर्श होताच आवळा काळा पडतो व त्याचे गुणधर्मही कमी होतात.) टोचलेले आवळे बराच वेळ चुन्याच्या पाण्यात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हे आवळे बाहेर काढून २ लिटर पाण्यात उकळवून वाफवून घ्यावेत. हे वाफवलेले आवळे पाण्यातून बाहेर काढून फडक्याने कोरडे करून घ्यावेत. ते २ किलो साखर किंवा खडीसाखरेच्या पक्क्या ३ तारी पाकात घालावेत व बरणीत भरून ठेवावेत. हा आवळ्यांचा मुरंबा २-३ वर्षे टिकून राहातो. शक्तिवर्धक तसेच तारुण्य टिकवण्यासाठी आवळ्यापासून बनवलेला 'च्यवनप्राश' आरोग्यासाठी अत्यंत हितकर आहे.
पित्ताच्या गांधी: अंगावर गांधी उठत असल्यास भिजलेली आवळकाठी बारीक वाटून सर्वांगास लेप करावा. तासाभराने स्नान करावे. अंगास साबण लाऊ नये. (रिठ्याच्या फेसाचा वापर करावा.)
पित्ताचा त्रास: पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी रात्रभर पाण्यात भिजलेली आवळकाठी, जिरे व लहान सुंठीचा तुकडा एकत्र वाटून अर्धा कप दुधासोबत पंधरा दिवस रोज सकाळी अनुशापोटी घ्यावे.
अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गांधी: रात्रभर पाण्यात भिजलेली आवळकाठी गोमूत्रात उगाळून, नारळाच्या अपरस रसात (पाणी न घालता काढलेल्या रसात) खलून सकाळी सर्वांगास चोळल्याने पित्ताच्या गांधी उठण्याचा त्रास कमी होतो.
पित्तशूळावर: आवळ्याचा व द्राक्षाचा रस समप्रमाणात एकत्र करून त्यात साखर घालून घ्यावा.
पित्तशूळाचा त्रास जाणवत असल्यास: मोरावळ्यात २०० मिलिग्रॅम प्रवाळ भस्म, २ ग्रॅम गुळवेल सत्त्व घालून खावे.
नेहमी आम्लपित्ताचा त्रास होणाऱ्यांनी: १० ग्रॅम आवळ्याचा रस, १५ ग्रॅम कुस्करलेल्या मनुका, १० ग्रॅम मध घालून दिवसातून किमान २ वेळा ३ दिवस घ्यावे.
पित्ताची उलटी, चक्कर: आवळ्याच्या बियांचा काढा करून दिवसातून तीन वेळा घ्यावा.
शीतपित्ताच्या विकारात: त्रिफळा चूर्ण मधात कालवून दिवसातून तीन वेळा सात ते चौदा दिवस घ्यावे.
रक्तपित्ताच्या विकारात: आवळकाठीचे चूर्ण १ भाग, साजूक तूप २ भाग व खडीसाखर ४ भाग एकत्र करून घ्यावे.
पित्ताचा नेहमी त्रास जाणवणाऱ्यांनी: मोरावळ्यात प्रवाळ भस्म, साजूक तूप आणि खडीसाखर घालून सात ते चौदा दिवस सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
नियमित आम्लपित्ताचा त्रास: ज्या लोकांना नियमित आम्लपित्ताचा त्रास होतो, त्यांनी आवळकाठीचे चूर्ण, केळीच्या कंदाच्या रसातून तीन ते सात दिवस अनुशापोटी सकाळी घ्यावे.