Extreme heat pregnancy risks: वाढत्या उष्णतेचा गर्भधारणा अन् प्रसूतीवर होतोय गंभीर परिणाम; पाहा काय सांगतो UN चा अहवाल

तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे गरोदर महिला व नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात आले असून, हवामान बदलाच्या या संकटात ही एक अत्यंत चिंताजनक आणि जीवघेणी स्थिती निर्माण झाली आहे.
Extreme heat pregnancy risks
Extreme heat pregnancy risksFile Photo
Published on: 
Updated on: 

Extreme heat pregnancy risks

नवी दिल्ली : जागतिक हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर, अति उष्णतेमुळे गर्भधारणा आणि प्रसूती ही एक नवीन संवेदनशील समस्या बनली आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टिल यांनी सोमवारी सांगितले. फिजी येथे आयोजित 'प्री-कॉप' परिषदेत 'बर्थराईट' अभियानाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते.

स्टिल यांनी एका सर्वेक्षणाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये भारतातील तज्ज्ञांसह ७३% माता आरोग्य तज्ज्ञांनी गेल्या पाच वर्षांत उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे नमूद केले आहे. या सर्वेक्षणात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, युनायटेड किंगडम आणि झिम्बाब्वे येथील १,००० माता आरोग्य तज्ज्ञांचा समावेश होता. जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या 'वेलकम' या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे.

Extreme heat pregnancy risks
pomegranate for heart health: डाळिंब हृदयासाठी अधिक फायदेशीर; कार्यक्षमतेत ८०% सुधारणा, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

"परिस्थिती स्पष्ट आणि अत्यंत चिंताजनक आहे; उष्णता वाढत असताना, गर्भधारणा आणि प्रसूती ही जागतिक हवामान संकटातील एक नवीन आणि संभाव्य जीवघेणी समस्या बनली आहे," असे स्टिल यावेळी म्हणाले. महिला, बालके, आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य कर्मचारी यांचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर कृती करण्याचे आवाहन या उपक्रमाद्वारे केले जात आहे.

सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष

सर्वेक्षणातील जवळपास सर्वच (९८%) तज्ज्ञांनी उष्णतेच्या लाटेचा प्रतिकूल परिणाम झालेल्या गरोदर महिलांवर उपचार केले आहेत. तसेच ९९% तज्ज्ञांनी उष्णतेचा फटका बसलेल्या नवजात बालकांवर उपचार केले आहेत. पाचपैकी चारहून अधिक (८१%) तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, जर अधिक उपाययोजना केल्या नाहीत, तर उष्णतेमुळे माता, गर्भातील बाळ आणि नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल. तापमान १ अंश सेल्सिअसने वाढल्यास वेळेपूर्वी प्रसूती होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी, तर गरोदरपणातील मधुमेहाचा धोका ७ टक्क्यांनी वाढतो, असे वेलकम संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्टिल यांनी सांगितले की, महिलांच्या बाबतीत, गर्भधारणेदरम्यान अति उष्णतेमुळे अकाली प्रसूती, मृत अर्भकाचा जन्म, जन्माच्या वेळी कमी वजन आणि प्रसूतीशी संबंधित समस्या वाढत चालल्या आहेत. हे धोके नवजात बालकांनाही, म्हणजेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात नाजूक टप्प्यावर, ग्रासतात.

तीन प्रमुख उपायांची शिफारस

१. सर्व देशांनी आपल्या राष्ट्रीय हवामान अनुकूलन आणि उष्णतेच्या नियोजन आराखड्यात गरोदर महिला व बालकांच्या आरोग्याचा विशेष समावेश करावा.

२. सतर्कतेचे इशारे, आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षित व थंड वातावरणाची निर्मिती करावी.

३. उष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीची अचूक नोंद ठेवावी.

आर्थिक मदतीची गरज

ब्राझीलमधील 'कॉप-३०' परिषदेत ठरल्यानुसार हवामान अनुकूलन निधी तिपटीने वाढवणे आवश्यक आहे. तसेच विकसनशील देशांसाठी दरवर्षी १.३ ट्रिलियन डॉलर निधीची उभारणी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. जर हा निधी उपलब्ध झाला नाही, तर हवामान बदलामुळे निर्माण होणारी असमानता आणि संकट अधिक गडद होईल, असा इशाराही यूएनच्या प्रमुखांनी दिला.

Extreme heat pregnancy risks
High Cholesterol: जिमला जाणाऱ्या आणि तंदुरुस्त व्यक्तींचेही वाढू शकते बॅड कोलेस्ट्रॉल; तुमच्या डॉक्टरांना विचारा हे ३ प्रश्न

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news