Back pain | पाठीचा मणका दुखतोय! 'या' ८ सवयी बदला, जाणून घ्या अधिक | पुढारी

Back pain | पाठीचा मणका दुखतोय! 'या' ८ सवयी बदला, जाणून घ्या अधिक

आपल्या शरीरातील मणका हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण, त्यामुळे माणूस सरळ उभे राहू शकतो. आपले वजन पेलू शकतो. तसेच कंबरेतून वाकू शकतो आणि लवचिक राहून कामे करू शकतो. त्यामुळेच मेरुरज्जू सुरक्षित राहू शकतो. रोजच्या आयुष्यात आपल्या काही सवयी या मणक्याला नुकसान पोहोचवतात. त्या सवयी किंवा हालचाली कोणत्या, हे लक्षात घेतले पाहिजे.

मणक्याला इजा झाल्यास कंबरदुखी होते आणि स्नायूंना झालेल्या इजेमुळे किंवा मणक्याला आधार देणार्‍या लिगामेंटस्ला झालेल्या दुखापतीमुळे कंबरदुखी सतावते. स्लिप डिस्कमुळेही कंबरदुखी होते. कारण, डिस्कवर दबाव पडतो. कार्टिलेज बाजूला ढकलल्या जातात. त्यामुळे कार्टिलेज स्पाईन कॉर्डच्या नसेवर दबाव टाकते. त्यामुळे खूप जास्त वेदना होतात. इतरही काही कारणे – ऑस्टियोपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, स्पायनल स्टेनोसिस, फायब्रमाइल्गिया यांच्यामुळेही मणक्याचे नुकसान होते. वरीलपैकी कोणतीही समस्या नसल्यास कंबरदुखी होण्यास काही रोजच्या सवयी किंवा रोजच्या कामाच्या सवयी कारणीभूत आहेत.

अतिवजन उचलण्याचे व्यायाम

खूप जास्त वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने हाडांची घनता वाढते आणि कंबर तसेच मणक्याच्या जवळचे स्नायू मजबूत होतात; मात्र क्षमतेपेक्षा खूप जास्त वजन उचलल्यास मात्र कंबरदुखी होते. इंटरनॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाऊंडेशनच्या मते आठवड्यातून चार वेळा 30 ते 40 मिनिटे खूप वजन उचलू शकता.

चुकीची शारीरिक स्थिती

शारीरिक स्थिती किंवा ठेवण यामुळे मणक्याची जागा बदलू शकते आणि मणक्याला त्रास होऊ शकतो. परिणामी, गुडघ्यांवर दाब वाढतो. आपली ठेवण किंवा स्थिती योग्य राहण्यासाठी सरळ उभे राहावे, सरळ बसावे आणि खांदे खाली असावे. मणक्याची स्थिती मजबूत करण्यासाठी स्पाईन लॅथनिंग स्ट्रेच करू शकतो.

फोन पकडण्याची पद्धत-

सर्जिकल टेक्नॉलॉजी इंटरनॅशनलच्या एका नव्या अभ्यासानुसार मोबाईल फोनमुळे व्यक्तीच्या मणक्यावर 50 टक्के अधिक दाब पडतो. त्यामुळे फोन कशा पद्धतीने पकडतो, त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आपण फोनकडे पाहताना वाकून पाहत असू, तर त्यामुळे वरच्या बाजूचा मानेचा मणका हा झुकलेल्या अवस्थेत असतो किंवा ओव्हर फ्लेक्स्ड स्थितीत असतो. त्यामुळे मणक्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

धूम्रपान

रोज धूम्रपान केल्यास मणक्याचे नुकसान होते. निकोटीन मणक्याच्या आसपास होणार्‍या सामान्य रक्ताभिसरणावर परिणाम करतो. त्यामुळे कंबरदुखी होते. काळाआधीच किंवा प्रीमॅच्युअर डिस्क डिजरनेशन म्हणजे मणक्याची झीज वेळेआधीच होते. त्याशिवाय धूम्रपानामुळे मणक्याची पोषक घटक शोषण्याची क्षमताही कमी होते. त्याचा परिणाम साहाजिकच मणक्याच्या आरोग्यावर पडतो.

अयोग्य पादत्राणे –

चुकीची पादत्राणे वापरल्यास विशेषतः उंच टाचेचे बूट वापरल्या कारणाने मणक्याची गोलाई व्यवस्थित राहत नाही किंवा मणक्याची गोलाई ही अलाईनमेंटच्या बाहेर जाते. पायावरील दाब कमी करण्यासाठी स्नीकर्स, बूट किंवा फ्लॅट शूज वापरावे.

कॅल्शिअमची कमतरता –

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअमची खूप जास्त गरज असते. दुग्धजन्य पदार्थात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे कॅल्शिअमचा स्रोत म्हणून हे पदार्थ आहारात जरुर सामील करावे. कमी प्रमाणात कॅल्शिअमचे सेवन केले जात असेल, तर शरीर हाडांतील असलेले कॅल्शिअम वापरू लागते आणि त्यामुळे मणका कमजोर होतो.

बैठ्या कामाचे वाढते स्वरूप –

हल्ली कामाचे स्वरूप बैठ्या प्रकारचे आहे. त्यामुळेही कंबरदुखी होते. अनेक तास सतत खुर्चीवर बसल्याने कंबरेच्या खालच्या भागावर दबाव पडतो. कंबरेला आराम मिळण्यासाठी अधून मधून उठावे किंवा कंबरेचा भागामागे उशी ठेवावी.

औषधे

काही औषधांमुळेही हाडे कमजोर होऊ शकतात. विशेषतः स्टेरॉईडमुळे हाडे कमजोर होतात. जितके जास्त स्टेरॉईडचे सेवन तितकाच आपल्या शरीर आणि मणका यांच्यावर दबाव पडणार. स्टेरॉईडयुक्त औषधांचा प्रमुख परिणाम होतो तो मेटाबोलिझम, कॅल्शिअम, डी जीवनसत्त्व आणि हाडांवर होतो. त्यामुळे हाडे कमजोर होतात. त्यांचे नुकसान होते. हाडे तुटू शकतात किंवा ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही उद्भवतो.

चुकीच्या पद्धतीने झोपणे

आपल्या झोपण्याची पद्धत चुकीची असेल, तर मणक्याचे नुकसान होते. आपण पोटावर झोपत असू तर मणक्याची स्थिती चुकीची होते. कारण, मणक्याची गोलाई आणि मान यांच्यावर दबाव पडतो. त्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी आणि मानेमध्ये वेदना होतात.

  • – डॉ. मनोज शिंगाडे

Back to top button