नगर : रस्ता दुरूस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक

नगर : रस्ता दुरूस्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक

चिचोंडी शिराळ : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी, शेवगाव नगर या तीन तालुक्यांना जोडणार्‍या कोल्हार-उदरमल घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे जीव जात आहेत. घाटातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती न केल्यास 11 जुलै रोजी ग्रामस्थांसह रास्ता रोको करण्याचा इशारा जय हिंद फाऊंडेशनने दिला आहे. एक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही अधिकार्‍यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे संघटनेच्या पुढाकाराने कोल्हार, उदरमल, चिचोंडी, शिराळ, डोंगरवाडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी येथील ग्रामस्थांनी 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजात कोल्हार घाटात रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्याची जय हिंदचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार व नगर तालुक्यातील उदरमल या ठिकाणी असलेला कोल्हार-उदरमल घाटातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, पावसाने साईडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे. या घाटातून सर्वसामान्य शेतकरी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात रहदारी करतात. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, अंबादास डमाळे, बाळासाहेब पालवे, कोल्हारचे सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, उदरमलचे सरपंच केशव भिंगारदिवे, शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, गितेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे, डोंगरवाडीचे सरपंच उद्धव गिते, डमाळवाडी सरपंच रामनाथ शिरसाठ, सोसायटीचे पदाधिकारी यांनी केले आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news