World Malaria Day 2022 : मलेरिया होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी  | पुढारी

World Malaria Day 2022 : मलेरिया होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी 

 पुढारी ऑनलाईन डेस्क : आज २५ एप्रिल जागतिक मलेरिया दिन. (World Malaria Day) ‘प्रोटोजुअन प्लाज्‍मोडियम’ (Protozoan Plasmodium) नावाच्या डासाची मादी एनोफिलीजपासून मलेरिया (Malaria) हा आजार होतो. लोकांमध्ये जनजागृती व्हावी, रोग नियंत्रणात येवून समूळ नष्ट व्हावा. यासाठी हा दिन साजरा केला जातो. मे २००७ या साली ६० व्या जागतिक आरोग्य परिषदेत हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. २००८ साली अफ्रिकेत प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. या आजाराने आजवर जगात अनेकांचा बळी घेतला आहे. तो होवू नये म्हणून आपण अगोदरच काळजी घेतली तर नक्की हा आजार आटोक्यात येवू शकतो. पाहूया मलेरिया होवू नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी. 

मलेरियाची लक्षणे

१) थंडी वाजून ताप येणे.

२) थंडी वाजणे

३) अंगदुखी

४) मळमळ आणि डोकेदुखी

५) उलटया जुलाब (अतिसार)

६) सांध्यामध्ये वेदना

साधारणपणे मलेरियाची अशी लक्षणे आढळतात.  तसेच खोकला, कावीळ आणि डोळे खूप निस्तेज होऊ शकतात. हुडहुडी भरून थंडी वाजणे, ताप आणि पाठोपाठ घाम असे सलग २-३ दिवस सुरु असते.  धोकादायक लक्षणांमध्ये भरपूर रक्त स्त्राव बेशुद्धपणा, किडनी निकामी होणे, मज्जातंतूचे त्रास आणि काही वेळेला तर माणूस मयत पण होवू शकतो. डास चावल्यापासून सुमारे २-३ आठवड्याने लक्षणे दिसू लागतात.

World Malaria Day : मलेरिया होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी 

१. शक्य असल्यास झोपताना मच्छरदाणी वापरा.

२. तुमच्या आजूबाजुच्या परिसरात सांडपाणी असल्यास त्याचा निचरा होईल असे करा. तसेच जास्त काळ पाणी साठू देवू नये.

३. तुमच्या भागात मलेरियाची साथ आली असेल तर डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालावित.

४. डास चावू नये म्हणून शक्य असल्यास प्रतिबंधक क्रिम लावावे.

५. परिसरात शोषखड्डे तयार करावेत.

६.  बंद गटारे तयार करण्यावर भर दयावा.

७. जंतू नाशक फवारणी सर्व ठिकाणी करून घेणे आवश्यक आहे.

८.  मलेरियाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

९. स्वच्छता पाळा, मलेरिया टाळा

यंदाची थीम 

दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना एक संकल्पना ठरवत असते. त्या संकल्पनेवर विवीध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. २०२२ ची संकल्पना ही ‘मलेरिया रोगाचा भार कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी नवकल्पना वापरणे’ ही आहे, तर २०२१ ची संकल्पना ही ‘शुन्य मलेरिया पर्यंत पोहचणे’ ही होती.

शोध मलेरियाचा 

ब्रिटीश डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी १८९८ साली डासांमुळे होणाऱ्या मलेरियावर संशोधन करुन त्याचा शोध लावला. की नेमका कोणत्या डासामूळे जीवघेणा असा मलेरिया आजार होतो. या संशोधनासाठी त्यांना  १९०२ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. या संशोधनामुळे मलेरिया निंयत्रणात आणणे सोपे झाले. 

मलेरियावरील पहिली लस 

मलेरिया म्हंटल की आजही माणसांना धडकी भरते. एवढा तो आजार जीवघेणा होता. अशा या जिवघेण्या मलेरिया आजारावरील लसीला ६ ऑक्टोबर २०२१ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता  दिली. RTS S/AS01 असं या मलेरिया लसीचं नाव आहे. जीएसके  GSK फार्मा कंपनीनं ती विकसित केली आहे.

मलेरियाचा धोका कमी करण्यात भारताला सातत्यपूर्ण यश 

सध्याची मलेरियाची परिस्थिती पाहता भारतात ८५% मलेरियाच्या केसेस कमी झाल्या आहेत. तर ७९ %मृत्यू कमी झाले आहेत. गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणाऱ्या मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल (WMR) 2020 जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केला होता.
यानुसार भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. मलेरियाचा प्रसार असणाऱ्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे जिथे  २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये या आजाराच्या केसेस १७.६ टक्के ने कमी झाल्या आहेत. तसेच वार्षिक परजीवी घटनांमध्येसुद्धा( API) २०१७ च्या तुलनेत २०१८ वर्षी २७.६ टक्के घट आणि २०१८ पेक्षा २०१९ मध्ये १८.४ टक्के घट झालेली आहे.  हा आकडा २०१२ पासून सातत्याने कमी राखण्यात भारताला यश आले आहे.

हेही वाचलतं का? 

  

Back to top button