छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या वयाबरोबर म्हणजेच म्हातारपणी हाडे कमकुवत होतात. हे जीवनचक्र आहे. मात्र, व्यसनाधीनता, निकृष्ठ जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे कमी वयातही अनेकांची हाडे ठिसूळ होऊ लागली आहेत. २५ वर्षांतील तरुणही हाडांच्या त्रासाने ग्रासल्याचे समोर येत आहे. अस्थिरोग तज्ज्ञ म्हणतात, की आळशीपणा सोडून नियमित व्यायाम, आहारात कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास हाडांचा त्रास काही काळ दूर ठेवता येतो. (World Osteoporosis Day)
दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस साजरा केला जातो. ऑस्टियोपोरोसिसचा प्रतिबंध, निदान आणि उपचारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. ऑस्टिओपोरोसिस हा हाडांचा आजार आहे, ज्यामुळे छोटी इजा झाली, तरी फ्रॅक्चरचा धोका वाढतो. हातपाय दुखणे, पाठदुखी, मानदुखी, सांध्यांमध्ये वेदना, पाठीमध्ये बाक येणे ही याची सामान्य लक्षणे आहेत. वयोमानानुसार हळूहळू हाडे कमकुवत होणे किंवा ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळता येत नाही. परंतु नियमित व्यायाम, किमान ४५ मिनिटे चालणे, सकस आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ही प्रक्रिया लांबवता येते. वृद्धांनी, चाळिशीनंतर महिलांनी हाडांची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. (World Osteoporosis Day)
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस आजार अधिक प्रमाणात आढळून येतो. रोजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या बदलांमुळे महिलांना हा विकार जडतो. घरातील बैठ्या कामांमुळे गुडघेदुखी, संधिवात होऊन हाडांची झीज होते. यामुळे चाळिशीनंतर महिलांनी हाडांची विशेषत्वाने काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. (World Osteoporosis Day)
व्यसनाधीनता, संधिवात, लठ्ठपणा, थॉयराइड, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, टाइपवन मधुमेह यामुळे कमी वयातही अनेकांना हाडांचा त्रास होत आहे. २५ ते ३० वयातील तरुणांच्या मागेही हाडाचे दुखणे लागले आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करावा.
-डॉ. यशवंत गाडे, आर्थोपेडिक सर्जन.
वयोमानानुसार प्रत्येकाला ऑस्टिओपोरोसिस चा कमी-अधिक प्रमाणात त्रास जाणवतो. पुरुषांपेक्षा ही समस्या स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते. नियमित व्यायाम, कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड'युक्त असंतुलित आहार घ्यावा आणि त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. एम. बी. लिंगायत, विभागप्रमुख अस्थिव्यंग शास्त्र, शासकीय वैद्यकीय रुग्णालय. छत्रपती संभाजीनगर