Aluchya Vadya : खमंग अळुच्या पानांच्या वड्या कशा कराल? | पुढारी

Aluchya Vadya : खमंग अळुच्या पानांच्या वड्या कशा कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात अनेक पदार्थ असं आहेत की, ज्यांचं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. खरडा-भाकर, झुणका भाकर, झणझणीत मिसळ अशा कितीतरी पदार्थांची नावं घेता येतील. आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत. त्याचं नाव आहे, अळुच्या वड्या (Aluchya Vadya). महाराष्ट्रात ग्रामीण भागात ही रेसिपी सामान्य आहे. पण, तळलेल्या किंवा वाफलेल्या अळुच्या वड्या खायला मिळणं एक पर्वणीच असतो. चला तर खमंग अळुच्या वड्या कशा करायच्या ते पाहू…

साहित्य

१) पाच सहा अळूची पानं

२) एक वाटी बेसन

३) लिंबाएवढी चिंच

४) एक कांदा

५) तीन-चार लसूण पाकळ्या

६) तेल, एक चमचा धने

७) दोन चमचे गरम मसाला

८) पाच-सहा लाल मिरच्या

९) अर्धी वाटी कोथिंबीर

१०) इंचभर आलं,

११) एक लाल टोमॅटो

१२) पाव वाटी खोबरं, चवीनुसार मीठ

कृती 

१) अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावी. दहा मिनिटं चिंच भिजत घालावी. भिजल्यावर चांगली कुस्करून घ्यावी.

२) त्याच चिंचेच्या पाण्यात अर्धा चमचा तिखट, मीठ, बेसन घालून भज्यांच्या पिठासारखं भिजवावं.

३) पानांची देठं काढून एक पान खाली ठेवावे. त्यावर भिजवलेलं बेसन पसरावं. मग त्यावर दुसरं पान ठेवावे. परत दुसऱ्यावर बेसन पसरवावं. अशी एकावर एक पानं ठेवावीत.

४) त्यानंतर ती पानं हळूहळू खालून दुमडावीत आणि गुंडाळी तयार करावी. अशा गुंडाळ्या कराव्यात.

५) एका पातेल्यात पाणी उकळत ठेवून त्यावर तेल लावून चाळणी ठेवावी. त्यात तेल लावून गुंडाळ्या ठेवाव्या.

६) झाकण ठेवून १५ मिनिटं वाफवाव्यात. गुंडाळ्या बाहेर काढून थंड होऊ द्याव्या. सुरीनं आडव्या कापून केळीच्या कापासारख्या गोल वड्या पाडाव्या.

७) फक्त वड्या (Aluchya Vadya) खायच्या असल्यास तव्यावर थोडंसं तेल टाकून जिऱ्याची फोडणी करून वड्या खमंग भाजाव्यात.

अशाप्रकारे टोमॅटो सॉस किंवा चिंचेच्या गोड चटणीसोबत या खमंग वड्या खावाव्यात. चिंच टाकली की, आळुच्या पानांची जी खवखव आहे, ती होत नाही.

रेसिपी व्हिडीओ : 10 मिनिटात बनवा उपवासाचे फराळी पकोडे 

या रेसिपी वाचल्या का ?

Back to top button