पोस्टमार्टमवेळी ‘ती’चे सगळे पुरुषी अवयव, पण एक मुलगा कसा झाला? | पुढारी

पोस्टमार्टमवेळी 'ती'चे सगळे पुरुषी अवयव, पण एक मुलगा कसा झाला?

मारुती वि. पाटील, कोल्हापूर

किरण बोरसे हिचे पोस्टमार्टम करताना डॉ. शर्मा यांना असं आढळून आलं होतं की, ती बाई नसून पुरुष आहे. तिचे सगळे पुरुषी अवयव अस्तित्वात होते. बाई नव्हती, तर मग दोघे संसार कसे करत होते? यांना एक मुलगा कसा झाला? सगळे प्रश्न भेडसावत होते. त्यामुळे कोणालाच काय सुचेना; पण पोलिसांनी शेवटी तपासात हे गूढ उकलले…

संबधित बातम्या 

बापट साहेबांनी पुन्हा त्या फ्लॅटची झडती घ्यायचा निर्णय घेतला. दुसर्‍या दिवशी त्यांनी बारकाईने तपास केला. काही जळालेली कागदपत्रे मिळाली. ती त्यांनी जप्त केली. त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी एक टीम पाठवली. तेव्हा दोघांचेही नातेवाईक कोकणातल्या एका खेडेगावात सापडले. त्यांना घेऊन पोलिस स्टेशनला आले. बापट साहेबांनी बोरसे कुटुंबातील त्या जीवन नावाच्या मुलाकडेही चौकशीचा निर्णय घेतला. तो लोणावळ्यातल्या एका निवासी शाळेत शिक्षण घेत होता. त्याला विश्वासात घेऊन त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांना असे समजले की, बाबा कामासाठी बाहेर जायचे. ते एका मॉलमध्ये कामाला होते.

आई घरीच असायची. प्रकाश आणि किरण यांच्यात बर्‍याचदा भांडणे होत होती. बाबा माघार घ्यायचे; पण आई माघार घेत नव्हती. तिला लहानसहान गोष्टींवरून राग यायचा. स्वत:चा मुलगा असूनही ती जीवनचा व्यवस्थित सांभाळ करत नव्हती. त्यामुळेच प्रकाशने जीवनला पाचगणीला निवासी शाळेत ठेवले होते. बोरसे कुटुंबाच्या शेजापाजारी चौकशी केली, तेव्हा किरण जास्त कोणात मिसळत नव्हती. हळदी-कुंकवाच्या समारंभात, जाऊळ अथवा लग्न समारंभात फक्त हजेरी लावण्यापुरती किरण उपस्थित असायची, अशी माहिती मिळाली. आता डॉ. शर्मा यांच्या स्टेटमेंटवर बापटसाहेब विचार करत होते; पण ही गुत्ती त्यांना काही सुटत नव्हती.

दुपारी ते जेवणासाठी घरी आले आणि विरंगुळा म्हणून बापट साहेबांनी आपला टीव्ही सुरू केला, तेव्हा ‘चाची 420’ हा हिंदी चित्रपट सुरू होता. चित्रपट पहाताना अचानक त्यांना काहीतरी आठवले. लागलीच त्यांनी आपला मोर्चा स्टेशनकडे वळवला. ‘खाडे, जरा ती बोरसे सुसाईडची केस फाईल आणा.’ त्यांनी हाताखालच्या शिपायाला सांगितलं. खाडेंनी ती फाईल आणून दिली. बापटांचा चेहरा खुलला. आपल्या काही सहकार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी कोकणातील प्रकाशच्या नातेवाइकांचं घर गाठलं. घरात प्रकाशचे म्हातारे आईवडील होते. वडील अंथरुणाला खिळून होते. बापट साहेबांनी त्या म्हातारीकडेच चौकशी सुरू केली.

‘आज्जी, तुमचा थोरला मुलगा नी सून मरून किती वर्षे झाली?’
‘सात वर्सं झाली की.’
‘मग नातू किती वर्साचा आहे, आणि कुठं हाय आज्जी?’
‘यंदा शिमग्याला आठवं लागलंया बगा त्याला. पकाकडंच असत्योय त्यो. पकानं माती खाली नस्ती तर त्येलाबी प्वार झालं असतं
आतापातोर.’
‘आज्जी, काय केलं त्यानं?’
‘बायल्याबरोबर घर नाय का थाटलं त्यानं. बाया वसाड पडल्यातका दुनयेत, कुनास ठाव. नाक कापलं तेनं.’
बापट साहेबांना एक क्लू मिळाला होता. त्यांनी किरणच्या नातेवाइकांना बोलावून घेतलं. त्यांना दमात घेत चौकशी केली, तेव्हा किरणच्या घरच्यांकडून सगळ्या गोष्टीचा शेवटी उलगडा झाला.

प्रकाश बोरसे हा तरुण कोकणातील एका खेडेगावातून नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. मिळेल ते काम करत त्याचे सोबत शिक्षणही चालू होतं. मुळात एकलकोंडी स्वभावाच्या प्रकाशला मुलींपेक्षा मुलांचे जास्त आकर्षण असायचं. पण त्याचा स्वभाव नडायचा. एके दिवशी कामासाठी लोकलचा प्रवास करत असताना किरण नावाच्या एकाबरोबर त्याची जुजबी ओळख झाली. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. नंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्या; पण कायदा.. समाज आडवा येत होता. किरणच्या घरच्यांची परवानगी होती; पण प्रकाशचे कुटुंब गावाकडचे. जुन्या चालीरीतीचे. त्यांनी विरोध केला; पण प्रकाश हट्टाला पेटला. त्याने सगळे झुगारून किरणशी रजिस्टर लग्न केले. तिथे रजिस्टरमध्ये पुरुषऐवजी ‘स्त्री’ असा किरणचा उल्लेख करून त्याने मॅरेज सर्टिफिकेट घेतले. संसार सुरू झाला; पण काही दिवसांनी किरकोळ कारणाने किरणशी खटके उडू लागले. किरण विक्षिप्तपणे वागायचा; पण प्रकाश माघार घेत वेळ मारून न्यायचा.

दरम्यान, एके दिवशी गावाकडे वीज पडून किरणच्या मोठ्या भावाचा आणि वहिनीचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यांना एक सहा महिन्यांचा मुलगा होता. प्रकाश आणि किरण दोघेही गावी गेले, तेव्हा त्या मुलाचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न निघाला. घरी आईवडील होते; पण म्हातारे. तेही आजारी. किरणने मूल आपण आपल्याला घेऊया का, म्हणून प्रकाशला विनवणी केली. प्रकाश गोंधळला; पण शेवटी तयार झाला. त्याने कागदोपत्री दत्तकपत्र तयार करून त्यावर आई-वडिलांची सही घेऊन त्या मुलासोबत ते दोघे परत मुंबईला आले. त्याचे जीवन असे नाव ठेवले. प्रकाशला एका मॉलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली होती. किरणही बचतगटात कामाला जायची.

सुरुवातीला जीवनसोबत किरण चांगली रमली; पण विक्षिप्तपणामुळे ती त्याचा व्यवस्थित सांभाळ करेना. काही वर्षे निघून गेली. किरणला वेडाचे झटके येत होते. ती त्यात भांडी आपट, कपड्यांना आग लाव, जीवनला मारझोड कर, असे प्रकार करायची. प्रकाशने समजावून सांगितले. औषधोपचार केले. थोडा गुण यायचा. शेवटी प्रकाशने जीवनला पाचगणीला एका निवासी शाळेत भरती केले. दोघेही पालकभेटीला मिळून जायचे. चांगले वागायचे; पण किरणला वेडाचे झटके आले की, ती विक्षिप्त वागायची. आठ वर्षे त्यांचा संसार सुरू होता.

त्या दिवशी किरणने स्वत:च्या अंगावरील कपड्यांना आग लावून घेतली होती आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रकाशही गंभीर भाजला. किरणचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश मृत्यूला झुंज देत दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला. निसर्गनियम झुगारून लावत जीवनात आशेचा प्रकाशकिरण फुलण्यिाचा एका दाम्पत्याचा हा प्रयत्न मात्र शेवटी नियतीपुढे अयशस्वी ठरला. (उत्तरार्ध)

Back to top button