Shirur Lok Sabha : शेतीच्या पाण्याने पेटणार शिरूर लोकसभेचे राजकारण

Shirur Lok Sabha : शेतीच्या पाण्याने पेटणार शिरूर लोकसभेचे राजकारण

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील शेतकर्‍यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला आठ-नऊ धरणांतील पाणीसाठा, पाण्याचे नियोजन व योग्य वाटप याभोवतीच आगामी काळातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण फिरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंचर येथे घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री तथा आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके या तिन्ही नेत्यांनी याबाबत आपल्या भाषणात याबाबतचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आणून दिले.

राज्यातील सर्वाधिक पाच धरणे जुन्नर तालुक्यात आहेत. पिंपळगाव जोगा, माणिकडोह, येडगाव, चिल्हेवाडी-पाचघर आणि वडज ही ती पाच धरणे. आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण आणि खेड तालुक्यातील चासकमान, कळमोडी आणि भामा आसखेड ही धरणे जुन्नर, आंबेगाव, शिरूरसह अहमदनगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत. या चारही तालुक्यांतील सुजलाम सुफलाम शेती, शिरूर लोकसभा मतदारसंघातील व अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने, गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये आलेली समृध्दी आणि सर्वात महत्त्वाचे येथील राजकारण या आठ-दहा धरणांच्या भोवतीच फिरत आहे.गेल्या काही वर्षांत धरणातील पाणी व या पाण्याचे योग्य नियोजन व वाटप हा मोठा राजकीय मुद्दा ठरत आला आहे. परंतु आगामी काळात या एकाच मुद्द्याभोवती संपूर्ण राजकारण फिरू शकते, याची झलक मंचरच्या शेतकरी मेळाव्यात आली.

मागील 15 दिवसांपूर्वी झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेत कर्जत-जामखेडचे लोकप्रतिनिधी तसेच शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी डिंभे धरणाच्या बोगद्यासंदर्भात सन 2018 मध्ये दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेल्या पत्राचा दाखला देत आपल्यावर होत असलेल्या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काही निर्णय घ्यायला लागल्याचे सांगत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी गेले काही वर्षे सत्तेत व सत्तेबाहेर असताना धरणातील पाण्याबाबत नेते दिलीप वळसे-पाटील आणि आपण स्वतः कसा संघर्ष केला व करत आहोत हे लोकांना सांगितले. धरणातील पाण्याचे रक्षण करण्यासाठी हा माझ्या वडिलांच्या वयाचा नेता (दिलीप वळसे-पाटील) आपल्या छाताडावर गोळ्या घेण्यास तयार झाला असे भावनिक आवाहन देखील केले.

त्यातच दिलीप वळसे-पाटील यांनी सन 2018 चे पत्र व त्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडीची सविस्तर माहिती लोकांना दिली. डिंभे धरणाच्या बोगद्याला विरोध केला नाही तर आपल्या डोळ्यासमोर हा सर्व सुजलाम सुफलाम भाग वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर रोहित पवार यांना मतदारसंघाची एवढीच काळजी वाटत असेल तर आंबेगाव तालुक्यातून निवडणूक लढवावी, आम्ही निवडून देऊ पण आमच्या तोंडचा खास पळवू नका, असेही वळसे-पाटील यांनी येथे स्पष्ट केले. एकंदरीत मंचर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात आगामी काळातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकारण शेतीच्या पाण्याभोवतीच फिरणार असल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवारांकडून दत्तात्रय वळसे पाटील यांच्या संघर्षाचा दाखला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिलीप वळसे-पाटील यांचे वडील दत्तात्रय गोविंदराव वळसे-पाटील यांनी घोड नदीवर धरण, बंधारे बांधण्यासंदर्भात विधिमंडळात घेतलेली भूमिका, त्या वेळच्या बैठकीतील इतिवृत्त वाचून दाखवत वळसे-पाटील कुटुंबाचा तालुक्यातील शेतकर्‍यांप्रति असलेला जिव्हाळा, काळजी लोकांसमोर मांडली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news